धक्कादायक! नागपुरात नायब तहसीलदाराची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट
पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Published : May 4, 2026 at 12:41 PM IST
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणाच्या वानाडोंगरी इथं नायब तहसीलदाराने रविवारी (4 मे) सायंकाळी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. वैभव रामेश्वर राठोड असं या नायब तहसीलदाराचे नाव आहे. ते वानाडोंगरी भागातील ग्रीन फिल्ड सोसायटीत राहत होते, तर नागपूर जिल्ह्यातील मौदा इथं नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते. घरी कुणीही नसताना वैभव रामेश्वर राठोड यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. ज्यावेळी त्यांची बहीण घरी आली, तेव्हा ते घराचे दार उघडत नव्हते. त्यानंतर दार तोडण्यात आले असता ही संपूर्ण घटना उघडकीस आली.
घरी कुणीही नसताना घेतला गळफास : वैभव हे ग्रीन फिल्ड सोसायटी येथील फ्लॅटमध्ये कुटुंबासह वास्तव्यास होते. ते मौदा इथं नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते. रविवारी ते साप्ताहिक सुट्टी असल्यामुळं घरीच होते. त्यांची पत्नी मुलगा आणि मुलीला घेऊन विवाह सोहळ्यानिमित्तानं बाहेरगावी गेली होती. त्यामुळं ते फ्लॅटमध्ये एकटेच होते. काल सायंकाळी वैभव यांची बहीण घरी आली असता, त्यांनी घराचे दार वाजवत वैभव यांना आवाज दिला. तसंच फोन केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा आतून बंद असल्यानं संशय बळावला. त्यांनी शेजाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि फ्लॅटचे दार उघडून आत गेल्यानंतर बेडरूममध्ये वैभव यांचा मृतदेह त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. घरी कुणीही नसताना वैभव यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
आत्महत्येचं कारण अस्पष्ट : पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करून वैभव यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. वैभव यांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळावर सुसाइड नोट अथवा अन्य काही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत. वैभव हे कुणाशीही फारसे बोलत नसत. शिवाय मागील काही दिवसांपासून तणावात होते, अशी माहिती शेजारच्या लोकांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
आत्महत्येपूर्वी नातेवाईकांना फोन : एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. वैभव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी नातेवाईकांना फोन केला होता. ते फार भावनिक झाले होते. त्यानंतर त्यांनी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं, अशी माहिती पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांनी दिली आहे.
टीप - आत्महत्या हा उपाय नाही : जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील, किंवा तुम्हाला एखाद्या मित्राची काळजी वाटत असेल, किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर तुमचे ऐकण्यासाठी नेहमीच कोणीतरी आहे. स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा आयकॉल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हेल्पलाइन 9152987821 वर कॉल करा (सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत उपलब्ध).
हेही वाचा :

