ETV Bharat / state

साताऱ्यात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचं जाहीर वाचन, 'उपटसुंभ' म्हणत आमदार संजय गायकवाडांचा तीव्र निषेध

'शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांचा पुरोगामी संघटनांनी तीव्र निषेध केला.

Shivaji kon hota book controversy
'शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचं साताऱयात वाचन करण्यात आलं (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 26, 2026 at 7:47 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सातारा - 'शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात साताऱ्यात आंदोलन करण्यात आले. पुरोगामी संघटनांनी एकत्र येत छत्रपतींच्या पुतळ्यासमोर पुस्तकाचे जाहीर वाचन करून गायकवाड यांच्या वक्तव्यांचा निषेध नोंदविला. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा उपटसुंभाला आवरावं, अशी मागणी आंदोलकांनी केली.

पुस्तकाचं केलं प्रकट वाचन - साताऱ्यातील शिवतीर्थावर (पोवई नाका) पुरोगामी संघटनांनी आ. संजय गायकवाड यांचा तीव्र शब्दात निषेध केला. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटू नका', अशा घोषणाबाजी केली. तसेच लेक लाडकी अभियानाच्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकट वाचन करून शिवाजी महाराजांच्या विचारांचा लोकाभिमुख व व्यापक दृष्टिकोन अधोरेखित केला.

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा - आमदार गायकवाड यांनी वापरलेल्या अश्लाघ्य भाषेचा व दिलेल्या धमक्यांचा तीव्र निषेध करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदाराला आवरावे, अन्यथा अवस्था वाईट होईल, असा इशारा देखील पुरोगामी संघटनांनी दिला. तसंच लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. प्रशांत आंबी यांना तत्काळ पोलीस संरक्षण द्यावे आणि आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली.

या आंदोलनात अ‍ॅड. वर्षा देशपांडे, अ‍ॅड. शैला जाधव, वसंत नलावडे, कॉ. विजय मांडके, गणेश भिसे, सादिक बागवान, शिरीष जंगम, कॉ. सर्जेराव भुजबळ, माणिक अवघडे, आनंदी अवघडे, कॉ. सलीम आतार, प्रमोद परामणे, प्रा. आनंद साठे, भगवान अवघडे, उदय चव्हाण, मीनाज सय्यद यांच्यासह पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा -

  1. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना दिली समज!
  2. आमदार गायकवाड नाही तर आता मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुतळा जाळून निषेध करणार, 'शिवाजी कोण होता'चे प्रकाशक प्रशांत आंबी संतापले
  3. कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात 'जोडे मारो' आंदोलन; पोलीस अन् आंदोलकांत झटापट