'शिवसेनेचे 35 आमदार फुटणार', संजय राऊतांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंनी लगावला टोला, पाहा काय म्हणाले ?
राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढं ढकलण्यात आल्या आहेत. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Published : December 1, 2025 at 2:10 PM IST
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढं ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं की, "एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तर निवडणुका थांबवल्या जात नाहीत. मात्र, यावेळी थांबवल्या गेल्या. यावर पूर्ण माहिती घेऊनच मी बोलेन. या निवडणुकीत आम्ही गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामांवरच प्रचार करत आहोत. मुख्यमंत्री किंवा मी, आम्ही कधी एकमेकांवर बोललो नाही. स्थानिक प्रश्न हे वेगळे असतात आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे.” यावेळी संजय राऊत यांच्या शिवसेनेचे 35 आमदार फुटणार असल्याच्या दाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलं.
उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले? : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या कारवाईबाबत आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “निवडणूक आयोग अनेक ठिकाणी धाडी टाकून चौकशी करत आहे. अशा चौकशा नेहमीच होत असतात.”
फडणवीस-शिंदे भेटीची चर्चा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघंही पैठण दौऱ्यादरम्यान एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असल्यानं त्यांच्यात खासगी चर्चा झाल्याची जोरदार चर्चा सुरू होती. यावर बोलताना शिंदे म्हणाले, “मी आधी आलो होतो, मुख्यमंत्री नंतर आले. पैठणमध्ये दोघांच्याही सभा आहेत. आमची फोनवर चर्चा होत असते. आमची चर्चा रोजच चालू असते. आम्ही नेहमीच एकमेकांशी संवाद करत असतो.”
'आम्ही एकमेकांवर टीका केली नाही' : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढं म्हणाले, “प्रचारात मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेत का? ही स्थानिक पातळीवरील निवडणूक आहे. स्थानिक प्रश्न हे वेगळे असतात. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आम्ही फक्त गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामांवरच प्रचार करत आहोत.” तसेच, निवडणूक ऐनवेळी थांबवल्याबाबत ते म्हणाले की, “निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याआधी कधीही निवडणुका थांबवल्या गेलेल्या नाहीत. पण यावेळी दुर्दैवानं तसं घडलं. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अशा पद्धतीनं निवडणुका कधीच थांबवल्या जात नाहीत. मी याबाबत पूर्ण माहिती घेऊनच यावर बोलणार आहे.”
'संजय राऊत यांना शुभेच्छा' : उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी “शिवसेनेचे 35 आमदार फुटणार” असल्याचं मोठं विधान केलं होतं. यावर शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी हसत-हसत हात जोडले आणि म्हटलं की, “मी संजय राऊत लवकर बरे व्हावेत, यासाठी शुभेच्छा देतो,” असं म्हणून ते निघून गेले.
हेही वाचा

