ETV Bharat / state

शिवसेना मेळाव्यातील अनुपस्थितीमुळं भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा चर्चेत; चंद्रकांत खैरेंची उघड नाराजी

शिवसेना (उबाठा) पक्षाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे विरोधी गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान पक्षाच्या महत्त्वाच्या मेळाव्याला गैरहजर राहिल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

KHAIRE ON BHAUSAHEB WAKCHAURE
माजी खासदार चंद्रकांत खैरे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 2, 2026 at 6:10 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

अहिल्यानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते विरोधी गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत असतानाच मंगळवारी शिर्डीत शिवसेनेच्या महत्त्वाच्या मेळाव्यातील त्यांच्या अनुपस्थितीमुळं या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे. त्यामुळं शिर्डीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

अहिल्यानगरमध्ये राजकीय चर्चांना उधाण : या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांनी विरोधी गटात जाऊ नये, असा सल्ला देताना चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्याबद्दलची खंतही व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्यामुळं राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. विशेष म्हणजे, भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी संस्थानचे कार्यकारी अधिकारी असताना चंद्रकांत खैरे यांनीच त्यांना सक्रिय राजकारणात आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत शिर्डी लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. मात्र, पुढील काळात काँग्रेसच्या संपर्कात गेल्यानंतर त्यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याची आठवणही चंद्रकांत खैरे यांनी करून दिली.

माध्यमांशी बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे (ETV Bharat Reporter)

शिर्डी लोकसभा मतदारसंघाकडं राज्याचं लक्ष : सध्या शिर्डीत ऑपरेशन टायगर यशस्वी होत असल्याच्या चर्चांदरम्यान भाऊसाहेब वाकचौरे यांच्या भूमिकेकडं विशेष लक्ष दिलं जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून खासदार झाल्यानंतरही त्यांनी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडं पाठ फिरवली असल्याची भावना काही शिवसैनिकांमध्ये सुरू असल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अनुपस्थितीमुळं निर्माण झालेल्या चर्चांवर अद्याप त्यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळं ते खरोखरच राजकीय भूमिका बदलण्याच्या तयारीत आहेत की या केवळ अफवा आहेत. याबाबतचा संभ्रम कायम आहे. आता या सर्व घडामोडींवर स्वतः भाऊसाहेब वाकचौरे काय स्पष्टीकरण देतात. याकडं शिर्डी लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

  1. '58 लाख नोंदींचे तातडीनं आदेश काढा'; मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीपूर्वी मनोज जरांगे पाटलांची महत्त्वाची मागणी
  2. बर्थडेला सोशल मीडियावर हवा करायचा कंड जिरला, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावाने खोटे शुभेच्छापत्र, तरुणावर गुन्हा दाखल
  3. 'चुकांचा पश्चात्ताप झालेल्यांनी मातोश्रीवर यावं, लाडकी बहीण योजनेत 1 कोटी अपात्र लाभार्थी'; संजय राऊतांचा आरोप