आधीच मोठमोठे खड्डे, मग भुयारी मार्गात साचलेलं पाणी; मुंबई-गोवा हायवेची दुरवस्था पाहून आदित्य ठाकरे संतापले!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आणि रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी डोलवी परिसराला भेट दिली.

Published : August 26, 2026 at 4:38 PM IST
रायगड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आज बुधवारी (26 ऑगस्ट) कोकण दौऱ्यावर असून रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वाशीनाका इथं त्यांचं आगमन झालं. यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केलं. परिसरातील नागरिकांनी विविध समस्यांबाबत आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनं दिली.
'आदित्य ठाकरे यांनी डोलवी परिसराला भेट दिली' : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आणि रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी डोलवी परिसराला भेट दिली. डोलवी इथं मुंबई-गोवा महामार्गावरील काँक्रीटच्या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि भुयारी मार्गात साचलेल्या पाण्याची त्यांनी पाहणी केली. यावेळी डोलवी ग्रामस्थांनी भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्यामुळे होणाऱ्या त्रासाची माहिती आदित्य ठाकरे यांना दिली. महामार्गाची दुरवस्था आणि भुयारी मार्गातील पाणी पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली.
यानंतर आदित्य ठाकरे यांनी नागोठणे उड्डाणपुलाचीही पाहणी केली. शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी पुलाच्या कामाची माहिती घेतली. दोन महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला हा पूल मागील महिनाभरापासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
केंद्रीय मंत्री गडकरींवर टीका : महामार्गाच्या दुरवस्थेवरून राज्य सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “गेली दोन वर्षे पालकमंत्री पदावरून भांडत होते, मंत्री पदावरून भांडत आहेत, बंगल्यावरून भांडत आहेत, गाडीवरून भांडत आहेत. पण रस्त्याच्या दुरवस्थेवरून कोण आवाज उठवणार?” कंत्राटदार काम सोडून पळून जाणार असतील, तर सरकारचा काय उपयोग, असा सवालही त्यांनी केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून महामार्गासाठी विविध तंत्रज्ञान आणि मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. मग प्रत्यक्षात महामार्गाची अशी दुरवस्था का आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर : दरम्यान, रायगडच्या कोलाड इथं आदित्य ठाकरे महामार्गालगत असलेल्या एका चहाच्या टपरीवर थांबले. त्यांनी टपरीधारकाची आस्थेने चौकशी करत संवाद साधला. महामार्गावरील खड्डे आणि खराब रस्त्यामुळे व्यवसायावर होणाऱ्या परिणामाची माहिती त्यांनी घेतली. गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होणार आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे, भुयारी मार्गातील पाणी आणि बंद असलेल्या उड्डाणपुलामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यात मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा

