ETV Bharat / state

निसर्ग संवर्धनासाठी कटिबद्ध राहू, तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवारांनी दिलं शपथपत्र

नाशिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवारांनी पर्यावरणप्रेमींना शपथपत्र दिलं आहे. निवडणूक जिंकल्यानंतर निसर्ग संवर्धनासाठी कटिबद्ध राहू, असं आश्वासन या शपथपत्राद्वारे दिलं आहे.

Shiv Sena UBT candidates affidavit
शिवसेना उमेदवारांचं शपथपत्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 4, 2026 at 11:05 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक : शहरातील वृक्षतोडीचा मुद्दा महानगरपालिका निवडणुकीतही चांगलाच तापलेला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी तपोवनातील झाडं वाचवण्याच्या चळवळीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी एक शपथपत्र देखील दिलं आहे. खरं तर, नाशिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवारांनी पर्यावरणप्रेमींना शपथपत्र दिलं आहे. निवडणूक जिंकल्यानंतर निसर्ग संवर्धनासाठी कटिबद्ध राहू, असं आश्वासन या उमेदवारांनी शपथपत्राद्वारे दिलं आहे.

शिवसेना उमेदवारांचं शपथपत्र (ETV Bharat)

'तपोवन वाचवा' नागरिकांची चळवळ : वास्तविक, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन परिसरात साधूग्राम उभारण्यासाठी सुमारे 1800 झाडं तोडण्याचा प्रस्ताव असून, याला पर्यावरणप्रेमींसह नाशिककरांनी तीव्र विरोध केला आहे. या विरोधातून 'तपोवन वाचवा' अशी चळवळ उभी राहिली आहे. या आंदोलनाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसह, मनसे आणि शिवसेना (उबाठा) पक्षानंही पाठिंबा दिला आहे.

Shiv Sena UBT candidates affidavit
शिवसेना उमेदवारांचं शपथपत्र (ETV Bharat)

या उमेदवारांनी दिलं शपथपत्र : काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी तपोवन परिसराला भेट देऊन पर्यावरणप्रेमींशी चर्चा केली होती. यावेळी वृक्षतोडीला विरोध करण्याची भूमिका घेत त्यांनी नाशिकमधील उमेदवार नाशिककरांना शपथपत्र देतील, असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आतापर्यंत उमेदवार मथुरा गांगुर्डे, मनीषा बागुल, वैभव ठाकरे, बालाजी माळोदे आणि जयेश बर्वे यांनी शपथपत्र देत 'तपोवन वाचवा' या नागरिक चळवळीला जाहीर पाठिंबा दिला आहे.

Shiv Sena UBT candidates affidavit
शिवसेना उमेदवारांचं शपथपत्र (ETV Bharat)

शपथपत्रात काय आहे? : शपथपत्रामध्ये तपोवनाचं ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करण्यात आलं असून विकासाच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीला स्पष्ट विरोध दर्शवण्यात आला आहे. तपोवनातील एकही झाड तोडलं जाऊ नये आणि या परिसराची मूळ ओळख अबाधित राखली जावी, अशी ठाम भूमिका उमेदवारांनी मांडली आहे.

चळवळीत सहभागी पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही शपथपत्रावर स्वाक्षरी करून तपोवन संरक्षणासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही देण्यात आली आहे. तसेच नागरिकांचा सहभाग, पारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि निसर्गसंवर्धन हेच खऱ्या विकासाचे मापदंड असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं आहे.

'आम्हाला त्यांनी शपथ दिली' : काही दिवसांपूर्वी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तपोवनाला भेट देऊन आमच्याशी चर्चा केली आणि आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करू, असं आश्वासन दिलं. त्यानुसार त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांनी आम्हाला पाठिंबा देत पर्यावरण संवर्धनासाठी शपथपत्र लिहून दिलं आहे,” असे पर्यावरणप्रेमी भारती जाधव यांनी सांगितलं

हेही वाचा