महाराजांचा पुतळा पडल्यानंतर बांधकाम कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणात माजी आमदार वैभव नाईकांसह शिवसैनिक निर्दोष
कुडाळमधील दिवाणी न्यायालयानं साहित्याचे नुकसान केल्याच्या आरोपात माजी आमदार वैभव नाईकांसह उबाठाचे मालवण तालुकाप्रमुख हरी मोहन खोबरेकर, माजी नगरसेवक मंदार मोहन केणींची निर्दोष मुक्तता केलीय.

Published : November 23, 2025 at 2:28 PM IST
|Updated : November 23, 2025 at 3:13 PM IST
सिंधुदुर्ग: मालवणमधील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंचधातूंचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरत त्या कार्यालयाचा दरवाजा अन् खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. तसेच अन्य साहित्याचे नुकसान केल्याच्या उद्धव सेनेचे माजी आमदार वैभव विजय नाईक यांच्यासह उद्धव सेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरिश्चंद्र उर्फ हरी मोहन खोबरेकर आणि माजी नगरसेवक मंदार मोहन केणी यांच्यावर आरोप करण्यात आले होते. परंतु या प्रकरणाची कुडाळ येथील दिवाणी न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली असता, त्यांनी सगळ्यांना निर्दोष मुक्त केले.
लाकडी दांड्यानं त्यांनी दरवाजा आणि खिडकीच्या काचा फोडल्या : 26 ऑगस्ट 2024 रोजी ही घटना घडली होती. या तिन्ही संशयितांच्या वतीने अॅड. सुधीर राऊळ, अॅड. कीर्ती कदम आणि अॅड. प्रज्ञेश राऊळ यांनी काम पाहिले. मालवण राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंचधातूंचा पूर्णाकृती पुतळा उभा केला होता. 26 ऑगस्ट 2024 रोजी दुपारच्या सुमारास सदर पुतळा कोसळला. त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तत्कालीन आमदार वैभव नाईक, हरिश्चंद्र उर्फ हरी खोबरेकर आणि मंदार केणी यांच्यासह अन्य उद्धव सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या घटनेच्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर ते तिथून दुपारी 2.30 वाजण्याच्या मालवण-मेढा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे गेले. वैभव नाईक, मंदार केणी, हरिश्चंद्र खोबरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलक्या दर्जाचा बांधला हेच त्याका जबाबदार हत अशी शिवराळ भाषा बोलून ते कार्यालयात घुसले आणि वैभव नाईक यांच्या हातात असलेल्या लाकडी दांड्यानं त्यांनी दरवाजा आणि खिडकीच्या काचा फोडल्या.
मालवण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होती : तसेच सदर कार्यालयातील टेबलावरील काचा आणि संगणकावर दांडा मारून नुकसान केले. नंतर ते तिघेही तिथून निघून गेले होते. याबाबत मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक कैलास शिवाजी ढोले यांनी मालवण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या शासकीय इमारतीच्या दरवाजा आणि खिडकीच्या काचा लाकडी दांड्याने फोडून कार्यालयातील टेबलावरील काचा आणि संगणकावर दांडा मारून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी वैभव नाईक, हरी खोबरेकर आणि मंदार केणी यांच्यावर मालवण पोलीस ठाण्यात सार्वजनिक संपत्ती हानी प्रतिबंधक अधिनियम- 1984 चे कलम 3 सह भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 3(5) प्रमाणे मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.
वैभव नाईक यांच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता : कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात सदर खटला सुरू होता. संशयितांच्या वतीने अॅड. सुधीर राऊळ, अॅड. कीर्ती कदम आणि अॅड. प्रज्ञेश राऊळ यांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून येथील दिवाणी न्यायाधीश जी. ए .कुलकर्णी यांनी वैभव नाईक यांच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता केलीय.
हेही वाचाः
'हर्षवर्धन सपकाळ यांना तर काँग्रेसचे कार्यकर्तेही ओळखत नाहीत', भाजपाचं काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर
ऐन थंडीत पावसाचं संकट; पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा

