ETV Bharat / state

साताऱ्यातील भादे गावात अफूची बेकायदेशीर शेती उघडकीस; 63 वर्षीय शेतकऱ्याला अटक

खंडाळा तालुक्यातील भादे गावात छापा टाकून सुमारे दोन लाख रुपयांची अफूची झाडं जप्त केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Shirwal Police
अफूची बेकायदेशीर शेती उघडकीस (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 1, 2026 at 1:32 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सातारा: शिरवळ पोलीस ठाण्याच्या पथकानं खंडाळा तालुक्यातील भादे गावात छापा टाकून सुमारे दोन लाख रुपयांची अफूची झाडं जप्त केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भादे गावातील सिद्धेश्वर मंदिराजवळील 'मळा' नावाच्या शिवारात दोन ठिकाणी प्रतिबंधित अफूची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी शेतमालक अशोक दगडू गायकवाड (वय 63) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईची माहिती फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनाही देण्यात आली आहे.

शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे, उपनिरीक्षक शंकर पांगारे, पोलीस अंमलदार सुधाकर सूर्यवंशी, नितीन नलवडे, गिरीश भोईटे, विजय शिंदे, अजित बोराटे, सुरज चव्हाण, अक्षय बगाड तसेच होमगार्ड अजय मोरे, संतोष इंगवले आणि प्रशांत चव्हाण हे फॉरेन्सिक टीम व शासकीय पंचांसह घटनास्थळी दाखल झाले.

अशोक गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल : तपासादरम्यान अफूची लागवड केल्याचं निदर्शनास आले. पोलीस व फॉरेन्सिक पथकानं सुमारे 2 लाख रुपये किमतीची 7 किलो 915 ग्रॅम अफू जप्त केली. खंडाळ्याचे नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी यांच्या उपस्थितीत अफूची झाडं जप्त करण्यात आली. या प्रकरणी अशोक दगडू गायकवाड यांच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. खंडाळा न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यात पोलीस अंमलदार अक्षय बगाड यांनी फिर्याद दिली असून उपनिरीक्षक शंकर पांगारे पुढील तपास करत आहेत. अंमली पदार्थांच्या व्यापार किंवा उत्पादनाबाबत माहिती असल्यास नागरिकांनी शिरवळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, संबंधिताचं नाव गोपनीय ठेवलं जाईल, असं आवाहन पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी केलं आहे.

हेही वाचा