शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; खग्रास चंद्रग्रहणानिमित्त साईबाबांचं दर्शन साडेतीन तास बंद
सोमवारी (दि.3 मार्च) खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. यानिमित्त शिर्डीतील साईबाबा मंदिरातील दर्शन व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. याबाबत संस्थाननं अधिकृत माहिती दिली आहे.

Published : February 27, 2026 at 2:44 PM IST
शिर्डी (अहिल्यानगर) : सोमवारी (दि.3 मार्च) खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. या ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानच्या वतीनं साईबाबा दर्शन व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. याबाबत साईबाबा संस्थानच्या वतीनं माहिती देण्यात आली आहे. धार्मिक परंपरा आणि शास्त्रानुसार ग्रहणकाळात मंदिरात काही नियम पाळले जात असल्यानं हा निर्णय घेतल्याचं संस्थाननं सांगितलं.
खग्रास चंद्रग्रहण काळात पारंपरिक पद्धतीनुसार पुजा होणार : "सोमवारी (दि. 3 मार्च) दुपारी 3.20 वाजल्यापासून सायंकाळी 6.48 वाजेपर्यंत म्हणजेच सुमारे 3 तास 28 मिनिटं खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. या कालावधीत साईबाबा समाधी मंदिर आणि मंदिर परिसरातील सर्व मंदिरांमध्ये दर्शन व्यवस्था पूर्णतः बंद राहणार आहे. या कालावधीत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. खग्रास चंद्रग्रहणानिमित्त पारंपरिक पद्धतीनुसार साईबाबांच्या समाधीवर तुळशीची पानं, दर्भ आणि हरळीचे दुर्वा अर्पण करून समाधी झाकण्यात येईल. तसंच मंदिरातील दहा ते पंधरा पुजारी ग्रहणकाळात विशेष पूजा व मंत्रोच्चार, जप आणि विधी सुरू राहतील," अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
मंदिराच्या वेळापत्रकात बदल : ग्रहणकाळ संपल्यानंतर सायंकाळी 7 वाजता यमुना, सरस्वती, गोदावरी, सिंधू, नर्मदा, कावेरी आणि गंगा या सात पवित्र नद्यांच्या जलानं साईबाबांच्या मूर्तीला मंगलस्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर 'शिर्डी माझे पंढरपूर' ही छोटी आरती तसंच धुपारती संपन्न होईल. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. यानंतर रात्री 10 वाजता नियमित शेजारती होऊन त्यानंतर मंदिर बंद करण्यात येईल. भाविकांच्या सोयीसाठी ही माहिती आगाऊ जाहीर करण्यात आली असून बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेऊन संस्थानला सहकार्य करावं, असं आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा :

