शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात प्रशासन ॲक्शन मोडवर, भाविकांना त्रास देणाऱ्यांवर मोठी कारवाई
साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास देणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय.

Published : February 22, 2026 at 8:05 AM IST
अहिल्यानगर(शिर्डी) - शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास देणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय. शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात भाविकांची फसवणूक व त्रास देणाऱयांची आता गय केली जाणार नाही. शिर्डी नगरपालिका, साईबाबा संस्थान आणि शिर्डी पोलीस प्रशासन संयुक्तपणे ॲक्शन मोडवर आले आहेत.

संयुक्त कारवाईला सुरुवात - शनिवारी सकाळपासून मंदिर परिसरात विशेष मोहिम राबवून अनेकांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. मंदिर परिसरात भाविकांना त्रास दिल्याच्या अनेक तक्रारी संस्थान आणि पोलिसांकडं प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर प्रशासनानं कंबर कसली असून, कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

भाविकांच्या होत्या तक्रारी - कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज लाखो भाविक शिर्डीत दाखल होतात. मात्र, मंदिर परिसरात काहीजण भाविकांना जबरदस्तीनं हार-प्रसादाच्या दुकानांकडं नेऊन वाढीव दरानं वस्तू विक्री करत असल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत होत्या. या माध्यमातून भाविकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचंही निदर्शनास आलं. तसंच काही भिक्षेकरी भाविकांच्या मागे लागून विनाकारण त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या.

संयुक्त कारवाई - या पार्श्वभूमीवर शिर्डी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अभय शेळके, नगरसेवक निलेश कोते, नितीन कोते, साईबाबा संस्थानचे सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी तसंच शिर्डी पोलीस यांच्या पथकानं संयुक्त कारवाई करत मंदिर परिसरातून भाविकांना त्रास देणाऱ्या अनेकांना ताब्यात घेतलं.

भाविकांसाठी सुरक्षित व सुलभ दर्शन व्यवस्था - ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात तर प्रौढ भिक्षेकऱ्यांना भिक्षेकरी सुधारगृहात पाठवण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी दिली. पुढील काळातही अशा प्रकारांविरोधात सातत्यानं मोहिमा राबवून भाविकांना सुरक्षित व सुलभ दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल, असा विश्वास प्रशासनानं दिला आहे.
हेही वाचा -

