साईमंदिरात मोठे दान! एशियन पेंट्सच्या प्रवर्तकाकडून 1 कोटी 2 लाखांचा डिमांड ड्राफ्ट संस्थानला सुपूर्द
एशियन पेंट्सचे प्रवर्तक रुपेन चौकसी यांनी साई मंदिरात 1 कोटी 2 लाखांचे दान केलं. साईंकडं काहीही मागितलं नाही, असे त्यांनी सांगितलं.


Published : January 7, 2026 at 3:40 PM IST
|Updated : January 7, 2026 at 3:46 PM IST
शिर्डी (अहिल्यानगर)- साईबाबा संस्थानला सन 2026 च्या नववर्षातील पहिलं मोठं दान प्राप्त झालं आहे. मुंबई येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि एशियन पेंट्सचे प्रवर्तक रुपेन चौकसी यांनी साईबाबांच्या चरणी 1 कोटी 2 लाख रुपयांचे दान अर्पण केलं आहे. ही देणगी त्यांनी डिमांड ड्राफ्ट स्वरूपात साई संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराव दराडे यांच्याकडे सुपूर्द केली आहे.
मुंबई येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि एशियन पेंट्सचे प्रवर्तक रुपेन चौकसी यांनी आज सहपरिवार शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांनी साईबाबांच्या माध्यान्ह आरतीलाही उपस्थिती लावली. साईबाबांच्या दर्शनानंतर चौकसी यांनी 1 कोटी 2 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात साई संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराव दराडे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी संस्थानच्या वतीनं देणगीदार चौकसी यांचा शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

लहानपणापासून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येतो. दरवर्षी न चुकता सहपरिवार शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत आहे. साईबाबांकडे काहीही मागत नाही. केवळ त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे येतो-रुपेन चौकसी,एशियन पेंट्सचे प्रवर्तक

आठ दिवसांमध्ये 23 कोटी 29 लाख रुपयांचे दान- देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या चरणी भाविक रोख रक्कम, सोने, चांदी अथवा वस्तुरूपात दान अर्पण करत असतात. यामध्ये अंबानी कुटुंबासह अनेक नामवंत उद्योगपती आणि सेलिब्रिटींचा समावेश आहे. यापूर्वी सन 2025 मध्ये 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत शिर्डीत भाविकांची विक्रमी गर्दी झाली होती. आठ दिवसांमध्ये साईबाबांच्या चरणी तब्बल 23 कोटी 29 लाख रुपयांचे दान भाविकांनी अर्पण केलं होतं. हे साई संस्थानच्या इतिहासातील एक विक्रमी दान मानले जाते.

सोन्याचे दान करणाऱ्या भक्तांच्या संख्येत वाढ- साईबाबांच्या चरणी आलेल्या दानाचा विनियोग हा भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी केला जातो. तसेच दोन चॅरिटेबल रुग्णालयांद्वारे वैद्यकीय सेवा देण्यासाठी तसेच शिर्डी शहराच्या विकासासाठी केला जातो. गेल्या काही वर्षांपासून साईबाबांच्या चरणी सोन्याचे दान करणाऱ्या भक्तांची संख्यादेखील लक्षणीयरीत्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा-

