ETV Bharat / state

दानशुरांमुळे शिर्डी साई संस्थानची आर्थिक भरारी; 3618 कोटींच्या मुदत ठेवीतून मिळाले 256 कोटींचे व्याज

शिर्डी साईचरणी दान देणाऱ्या भक्तांची संख्या खूप आहे. आता श्री साईबाबा संस्थानची आर्थिक भरारी आणि भाविकांची अपार श्रद्धा दर्शवणारी आकडेवारी समोर आली आहे.

Sai Donation
साई संस्थानला कोटींच्या देणग्या (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 17, 2026 at 6:43 PM IST

|

Updated : June 17, 2026 at 7:00 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी : देश-विदेशातील कोट्यवधी साईभक्तांच्या अढळ श्रद्धेमुळं शिर्डीतील साईबाबा संस्थानची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संस्थानला रोख, डिजिटल आणि वस्तूरूप देणग्यांसह सुमारे 660 कोटी रुपयांचं योगदान प्राप्त झालं आहे. याचबरोबर संस्थानच्या मुदत ठेवींचा आकडा 3618 कोटी रुपयांवर पोहोचला असून केवळ व्याजातूनच 256 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालं आहे.



संस्थानला एकूण 638 कोटी रुपयांची आर्थिक देणगी : गेल्या वर्षभरात तब्बल 3 कोटींहून अधिक भाविकांनी शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेतलं. भाविकांकडून मिळणाऱ्या देणग्या, डिजिटल माध्यमातून वाढणारे दान आणि सुयोग्य आर्थिक व्यवस्थापनामुळं संस्थानचा आर्थिक पाया अधिक भक्कम होत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संस्थानला एकूण 638 कोटी रुपयांची आर्थिक देणगी प्राप्त झाली. याशिवाय वस्तूरूप देणगी सुमारे 28 कोटी रुपयांची मिळाली. साई संस्थानच्या रुग्णालयांसाठी भाविकांनी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणेही दान केली. त्यांची किंमत अंदाजे 15 ते 20 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळं एकूण योगदानाचा आकडा सुमारे 660 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया देताना मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (ETV Bharat Reporter)



देणगीच्या प्रमाणात वाढ : देणग्यांच्या स्वरूपाचा विचार केला असता, दक्षिणा पेटी आणि देणगी काउंटरमधून 195.24 कोटी रुपयांचे रोख दान जमा झाले आहे. ऑनलाइन, यूपीआय, डेबिट-क्रेडिट कार्ड, चेक आणि डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून 122.38 कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली. परदेशातील साईभक्तांनी 4.89 कोटी रुपयांचे परकीय चलन अर्पण केले. तर दर्शन आणि आरती प्रवेशिका शुल्कातून 39.55 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. डिजिटल व्यवहारांना वाढते प्राधान्य मिळत असल्यानं ऑनलाइन देणगीच्या प्रमाणात सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे.



मुदत ठेवींवरील व्याजाचा मोठा वाटा : साई संस्थानच्या आर्थिक बळकटीत मुदत ठेवींवरील व्याजाचा मोठा वाटा आहे. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत केवळ मुदत ठेवींवरील व्याजातून 256.69 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं. संस्थानकडं विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 3618.56 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहे. दरवर्षी खर्चानंतर उरणारी रक्कम पुन्हा मुदत ठेवींमध्ये गुंतवली जात असल्यामुळं हा निधी सातत्यानं वाढत आहे.



संस्थानची आर्थिक प्रगती : भाविकांनी अर्पण केलेल्या मौल्यवान सोने, चांदीच्या साठ्यातही मोठी वाढ झाली आहे. 15 जून 2026 अखेर संस्थानकडं 549.44 किलो सोने असून त्याचं मूल्य सुमारे 151.87 कोटी रुपये आहे. तसेच 7030.47 किलो चांदीचा साठा असून त्याचं मूल्य सुमारे 25.33 कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षातच भाविकांनी 16 किलो सोने आणि 197 किलो चांदी साई चरणी अर्पण केली आहे. संस्थानच्या उत्पन्नात गेल्या काही वर्षांत सातत्यानं वाढ होत आहे. 2021-22 मध्ये 436.95 कोटी रुपये असलेलं उत्पन्न 2022-23 मध्ये 803.93 कोटींवर पोहोचले. त्यानंतर 2023-24 मध्ये 819.57 कोटी, 2024-25 मध्ये 850.97 कोटी आणि 2025-26 मध्ये 851.97 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यात आला. या आकडेवारीवरून संस्थानची आर्थिक प्रगती सातत्यानं होत असल्याचं दिसून येत आहे.


निधीचा वापर कोठे केला जातो? : साईभक्तांकडून मिळणाऱ्या निधीचा वापर साई संस्थान विविध समाजोपयोगी आणि जनकल्याणकारी उपक्रमांसाठी केला जात आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संस्थानने पायाभूत सुविधा, रुग्णालये, आरोग्य सेवा, आशियातील सर्वात मोठ्या मोफत प्रसादालयाचे संचालन, वीज खर्च, कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांचे वेतन, भक्तनिवासे, शैक्षणिक संकुले तसेच इतर जनहिताच्या योजनांवर एकूण 552.33 कोटी रुपये खर्च केले.


वार्षिक आर्थिक व्यवहार किती? : साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलं की, साईबाबांनी दिलेला अन्नदान, सेवाभाव आणि मानवतेचा संदेश संस्थान प्रभावीपणे जपत आहे. भाविकांकडून मिळणाऱ्या देणग्यांचा उपयोग रुग्णसेवा, शिक्षण, भक्तनिवासे आणि विविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी करण्यात येत असून त्यामुळं शिर्डीचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व अधिक वृद्धिंगत होत आहे. कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेच्या बळावर उभ्या असलेल्या या संस्थानचा वार्षिक आर्थिक व्यवहार 850 कोटी रुपयांहून अधिक झाला. वाढत्या देणग्या, मजबूत गुंतवणूक आणि व्यापक सामाजिक कार्यामुळं शिर्डी साईबाबा संस्थान देशातील सर्वाधिक सक्षम आणि प्रभावी धार्मिक संस्थांपैकी एक म्हणून पुढे येत आहे.

हेही वाचा -

  1. शिर्डी साईबाबांच्या चरणी लखनौच्या भाविकानं तब्बल 92 लाखांचा सुवर्ण मुकुट केला अर्पण!
  2. साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरेंची साई चरणी मोठी देणगी; 46 लाखांचे सुवर्ण ॐ अक्षरांची देणगी
  3. सोन्याचे दर वाढले तरी श्रद्धा अनमोल; साईभक्त महिलेकडून साईबाबांच्या चरणी 11 लाख 99 हजार रुपयांचे ब्रोच अर्पण
Last Updated : June 17, 2026 at 7:00 PM IST