ETV Bharat / state

शिर्डीत साईबाबांच्या 'व्हीआयपी ब्रेक दर्शना'साठी आता मोजावे लागणार अधिक पैसे; संस्थानकडून शुल्क वाढवण्याचा मोठा निर्णय

शिर्डी साईबाबा संस्थाननं व्हीआयपी भाविकांच्या 'ब्रेक दर्शन प्रोटोकॉल' शुल्कात 100 रुपयांची वाढ केली असून, 9 जुलैपासून प्रति व्यक्ती 300 रुपये शुल्क लागू होणार आहे.

SHIRDI VIP DARSHAN RATE
साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची लागलेली रांग (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 9, 2026 at 1:32 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी : साईबाबा संस्थाननं व्हीआयपी भाविकांसाठीच्या 'ब्रेक दर्शन प्रोटोकॉल' सुविधेच्या शुल्कात 100 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून (दि.9) ब्रेक दर्शनासाठी प्रति व्यक्ती 300 रुपये शुल्क आकारलं जात आहे. या निर्णयामुळं सशुल्क दर्शन घेणाऱ्या सामान्य भाविकांवरील अन्याय दूर झाला असून संस्थानच्या तिजोरीतही अल्पशी भर पडणार आहे.

भाविकांचा मनस्ताप दूर करण्यासाठी प्रयत्न : "शिर्डी साईबाबा संस्थानतर्फे सकाळी 9 ते 10, तसंच दुपारी 2.30 ते 3.30 आणि रात्री 8 ते 8.30 अशा तीन वेगवेगळ्या वेळेत साई संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत 200 रुपये शुल्कात ब्रेक दर्शन दिलं जात होतं. दुसरीकडं, सर्वसामान्य भाविकही झटपट दर्शनासाठी दर्शन लाईन कॉम्प्लेक्समधील गेट क्रमांक 6 आणि 7 मधून 200 रुपयेच मोजत होते. मात्र, झटपट दर्शनाची रांग पुढं जाऊन मुख्य रांगेत मिसळत असल्यानं भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. तर, तितकेच पैसे देऊन प्रोटोकॉलधारकांना थेट व्हीआयपी सुविधा मिळत होती. ही तफावत शुल्क वाढवून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला," अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.

भाविकांसाठी अधिक सुविधांचा लाभ : सशुल्क साईदर्शन आणि आरती घेणाऱ्या भाविकांच्या तुलनेत ब्रेक दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या केवळ सव्वापाच टक्के आहे. तर, साई मंदिराला भेट देणाऱ्या एकूण भाविकांच्या तुलनेत हे प्रमाण अवघं अर्धा ते पाऊण टक्का आहे. ब्रेक दर्शनाचं शुल्क वाढवताना सामान्य रांगेप्रमाणंच ब्रेक दर्शनाच्या वेटिंग हॉलमध्येही भाविकांसाठी चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. जे सामान्य भाविक 200 रुपये मोजून रांगेत जाऊन सशुल्क दर्शन घेतात. त्यांना मात्र बहुतेकदा मनस्तापाला सामोरं जावं लागतं. पैसे भरूनही हवं तसं झटपट दर्शन होत नाही. यातही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. या भाविकांसाठी किमान नंदी मूर्तीपर्यंत तरी थेट स्वतंत्र रांग असावी. जेणेकरून पैसे देऊनही होणारा त्यांचा मनस्ताप थांबेल, अधिक भाविक या सुविधेचा लाभ घेतील. या निर्णयाचं भाविकांनी स्वागत केलं आहे.

ब्रेक दर्शनातून वर्षभरात 3 कोटींहून अधिकचं उत्पन्न : 22 जून 2025 ते 30 जून 2026 या वर्षभराच्या कालावधीत तब्बल 1 लाख 58 हजार 596 भाविकांनी ब्रेक दर्शन सुविधेचा लाभ घेतला. यातून साई संस्थानला 3 कोटी 17 लाख 19 हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. याच काळात सुमारे 30 लाख भाविकांनी सशुल्क दर्शन आणि आरती योजनेचा लाभ घेतला.

हेही वाचा :

  1. श्रीरामपुरात संत निवृत्तीनाथांची पालखी विठ्ठल नामाच्या जयघोषात दाखल; तृतीयपंथीयांनी लाडू वाटप करत जपली सामाजिक समता
  2. 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार! अमरावतीच्या लोणी गावातील 'पाजणकर वाड्यात' क्रांतिकारक तात्या टोपे यांनी केला होता मुक्काम
  3. पाताळगंगा नदीत तब्बल 3 हजार गॅस सिलिंडर गेले वाहून; नेमका प्रकार काय?