ETV Bharat / state

शिर्डी साईबाबांच्या चरणी भक्तानं अर्पण केला 1 किलो 60 ग्रॅम वजनाचा सुवर्णमुलामा असलेला चांदीचा मुकुट!

कोलकाता येथील भक्ताने शिर्डी साईबाबांना 1 किलो 60 ग्रॅम वजनाचा सुवर्णमुलामा असलेला चांदीचा मुकुट अर्पण केला आहे.

Shirdi Sai Baba gold plated silver crown
शिर्डी साईबाबांच्या चरणी सुवर्णमुलामा असलेला चांदीचा मुकुट अर्पण (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : November 5, 2026 at 7:47 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी - श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात देश-विदेशातून लाखो भाविक नतमस्तक होतात. प्रत्येक भक्त आपल्या श्रद्धेनुसार साईचरणी काही ना काही अर्पण करत असतो. मात्र, काही भक्तांच्या अर्पणामागे केवळ दान नसते तर साईबाबांवरील अपार विश्वास कृतज्ञता आणि आयुष्यातील अविस्मरणीय अनुभवांची भावस्पर्शी कहाणी असते. असाच एक अनोखा भक्तिभाव कोलकाता येथील साईभक्त पूर्ण चंद्रा बेरा यांनी व्यक्त केला आहे. साईबाबांनी आपल्या आयुष्यात आनंदाची झोळी भरल्याच्या कृतज्ञ भावनेतून त्यांनी तब्बल 1 किलो 60 ग्रॅम वजनाचा सुवर्णमुलामा केलेला देखणा चांदीचा मुकुट साईचरणी अर्पण केला.

Shirdi Sai Baba gold plated silver crown
शिर्डी साईबाबांच्या चरणी सुवर्णमुलामा असलेला चांदीचा मुकुट अर्पण (ETV Bharat Reporter)

कोलकाता येथील पूर्ण चंद्रा बेरा हे गेल्या 15 वर्षांपासून नियमितपणे शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेत आहेत. यावेळी त्यांनी हा मौल्यवान मुकुट अर्पण करण्यामागील आपल्या आयुष्यातील एक भावनिक आणि अविस्मरणीय अनुभव कथन केला.

बेरा यांच्या पत्नी दोन महिन्यांच्या गर्भवती असताना ते शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी संपूर्ण मंदिर परिसर फिरूनही त्यांना साईबाबांचे समाधानकारक दर्शन घेता आले नव्हते. मात्र, मंदिराबाहेर एका भिकाऱ्याच्या रूपात त्यांना एक अनोखा अनुभव आला. या प्रसंगाची आठवण आजही त्यांच्या मनात कायम आहे. पुढे त्यांच्या घरी पुत्ररत्नाचे आगमन झाले. विशेष म्हणजे त्यांच्या मुलाचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाला. त्यांनी आपल्या मुलाचे नाव विभू हरिश्चंद्र बेरा असे ठेवले.

Shirdi Sai Baba gold plated silver crown
शिर्डी साईबाबांच्या चरणी सुवर्णमुलामा असलेला चांदीचा मुकुट अर्पण (ETV Bharat Reporter)

चांदीचा मुकुट भक्तिभावाने अर्पण - आयुष्यात मिळालेला हा आनंद म्हणजे साईबाबांचा आशीर्वादच असल्याची त्यांची भावना आहे. याच श्रद्धेतून आणि कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांनी साईबाबांच्या चरणी 1 किलो 60 ग्रॅम वजनाचा सुवर्णमुलामा असलेला आकर्षक चांदीचा मुकुट भक्तिभावाने अर्पण केला. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने देणगीदार पूर्ण चंद्रा बेरा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा यथोचित सन्मान करण्यात आला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी बेरा कुटुंबाचा सत्कार केला.

Shirdi Sai Baba gold plated silver crown
शिर्डी साईबाबांच्या चरणी सुवर्णमुलामा असलेला चांदीचा मुकुट अर्पण (ETV Bharat Reporter)

हेही वाचा -

  1. 90 रुपयांच्या सॉक्सपासून 1 कोटींचा ऐवज! शिर्डी साईदरबारातील प्रामाणिकपणाची 'ही' प्रेरणादायी कहाणी वाचली का?
  2. साईचरणी 20 लाखांचे सुवर्णदान; दुबई-मुंबईच्या भक्तांकडून 162 ग्रॅमची दोन सुवर्ण स्वस्तिके अर्पण
  3. भक्तांची कमी संख्या, वीज बिल वाढ; शिर्डीत हॉटेल मंदीमुळे दुकानदार ते कामगार सगळेच अडचणीत