ETV Bharat / state

यशवंत बँकेतील ११२ कोटींच्या अपहार प्रकरणी शेखर चरेगावकर यांना अटक, चार दिवस पोलीस कोठडी

भाजपाचे नेते आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना आर्थिक घोटाळ्याच्या गुन्ह्यात बुधवारी अटक करण्यात आली आहे.

शेखर चरेगावकर यांना अटक
शेखर चरेगावकर यांना अटक (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 25, 2026 at 10:44 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सातारा - कराडच्या यशवंत को ऑपरेटीव्ह बँक मधील 112 कोटी 10 लाख 57 हजार रूपयांच्या अपहार प्रकरणी भाजपा नेते तथा सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना जिल्हा अर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी पहाटे अटक केली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, अटकसत्रामुळे घोटाळ्याच्या गुन्ह्यातील अन्य आरोपींचे धाबे दणाणले आहेत.


सनदी लेखापाल मंदार शशिकांत देशपांडे यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यशवंत को-ऑप. बँक लि. कराड या बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, 5 अधिकारी, संचालक मंडळ आणि तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचे 9 नातेवाईक, अशा 50 जणांनी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी बँकेचे आर्थिक नुकसान करुन संगनमताने 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रूपयांचा अपहार केला असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले होते. त्यावरून बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, कराड शाखेतील कर्ज विभागाचे शाखा व्यवस्थापक आणि शेखर चरेगावकरांच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.


दरम्यान, ईडीच्या पथकाने २३ डिसेंबर २०२५ रोजी धाड टाकून शेखर चरेगावकर यांचा दत्तक भाऊ शौनक उर्फ विठ्ठल गोविंद कुलकर्णी यास अटक केली होती. तर दुसरा भाऊ मुकुंद उर्फ शार्दुल चरेगावकर याला ताब्यात घेऊन दिवसभर चौकशी केली होती. शेखर चरेगावकर त्यावेळी नागपुरात होते. नंतर ईडीने मुंबई कार्यालयात त्यांची चौकशी केली होती. गुन्ह्याची व्याप्ती पाहून कराड शहर पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास जिल्हा अर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.


शेखर चरेगावकर यांना बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. पुष्पा जाधव यांनी जोरदार युक्तिवाद केला. ११२ कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा असून १९५ कर्ज खात्यांचा तपास करणे आवश्यक आहे. घोटाळ्यातील रक्कम कुठे खर्च केली. तसेच बोगस कंपन्यांचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी त्यांनी केली. न्यायालयाने चरेगावकरांना २ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, अटकेबद्दल विचारले असता 'माझा न्याय देवतेवर विश्वास आहे', अशी प्रतिक्रिया त्यांनी न्यायालयाबाहेर माध्यमांना दिली.