शरद पवारांची राजकीय ताकद कमी झाली, ते आता राज्यसभेत कसं जातील? असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला टोला
खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शरद पवार यांच्या राजकीय भविष्यावर टिप्पणी केली आहे. पवारांकडे संख्याबळ नसल्यानं ते राज्यसभेत कसं पोहोचणार? असा सवाल ओवैसींनी अमरावतीत केला.

Published : January 5, 2026 at 1:38 PM IST
अमरावती : एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण तापवलं आहे. अमरावती इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांना टोला लगावला आहे. ओवैसी यांनी दावा केला की, "पवारांचं संसदीय भविष्य आता धोक्यात आहे. त्यांनी म्हटलं की, राज्यसभेत प्रवेश मिळविण्यासाठी पवारांकडे आता आवश्यक संख्याबळ नाही". खरं तर, मार्चमध्ये पवारांचा कार्यकाळ संपत आहे.
'शरद पवारांची राजकीय ताकद कमी झाली' : ओवैसींच्या मते, महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय वातावरणामुळे पवारांची राजकीय ताकद कमी झाली आहे. मार्चनंतर पवारांचं काय होतं? हे पाहणं रंजक ठरेल, असंही त्यांनी उपहासात्मकपणे म्हटलं.
असदुद्दीन ओवैसी यांनी थेट शरद पवारांच्या राजकीय ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मार्चनंतर शरद पवारांकडे ताकद कुठं आहे? त्यांच्याकडे इतके आमदार कुठे आहेत? आकडेवारीचा हवाला देत ओवैसी म्हणाले की, राज्यसभेत प्रवेश करण्यासाठी संख्याबळ आवश्यक आहे. मार्चनंतर पवार संसदेत कसे पोहोचतील? हा एक मोठा प्रश्न आहे.
'पवारांची महाराष्ट्राच्या राजकारणावरील पकड कमकुवत' : ओवैसी पुढे म्हणाले की, राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा शरद पवारांच्या भविष्यावर परिणाम होत आहे. अजित पवार वेगळे झाल्यानंतर शरद पवारांकडील आमदारांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. राज्यसभा निवडणुका पूर्णपणे आमदारांच्या संख्येवर अवलंबून असतात.
'लव्ह जिहाद’वरून आरएसएस-भाजपाला थेट आव्हान : यासोबतच, ओवैसी यांनी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्या ‘लव्ह जिहाद’ वरील वक्तव्यावरुनही तीव्र प्रतिक्रिया दिली. एखादी व्यक्ती 18 किंवा 21 वर्षांची झाली असेल आणि स्वतःचे निर्णय घेत असेल, तर तो कोणाच्याही आवडीनिवडीचा विषय नसून कायद्यानं दिलेला अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘जर खरंच 'लव्ह जिहाद' घडत असेल, तर त्याचा अधिकृत डेटा संसदेत सादर करावा. गेल्या 11 वर्षांचा रेकॉर्ड द्यावा. 'लव्ह जिहाद' नेमकं काय, याची स्पष्ट व्याख्या भाजपा आणि मोहन भागवत यांनी करावी,’ असं थेट आव्हान ओवेसी यांनी दिलं.
तसेच, देशातील बेरोजगारी, चीन, लडाख यांसारख्या गंभीर राष्ट्रीय प्रश्नांवर भाजपा आणि आरएसएसकडे उत्तर नसल्याची टीकाही ओवेसी यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यांमुळे राज्याचं राजकीय वातावरण तापलं असून, आता संबंधित पक्षांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा
- भारत-पाकिस्तान सामन्यामधील पैशांचं मूल्य बळी पडलेल्या २६ नागरिकांच्या जीवापेक्षा जास्त आहे का?-असुद्दीन ओवैसी
- अमरावती मुख्यमंत्र्यांचा रोड शो, महापालिका निवडणूक प्रचाराचा 'श्री गणेशा', पक्ष निरीक्षकांना चालावं लागलं पायी
- चूक झाली माफ करा, मात्र भाजपासोबतच राहा; चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराज कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन मागितली माफी

