ETV Bharat / state

शरद पवार हे भाजपाप्रणीत एनडीएबरोबर जाणार नाहीत, संजय राऊतांचा आशावाद

“शिंदेंना एका दिवसाची बातमी हवी असते. याला फोडलं, त्याला पक्षात घेतलं. पण जे त्या पक्षात जातात, त्यांचं पुढे काय होतं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut
शिवसेने(उबाठा)चे खासदार संजय राऊत (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 8, 2026 at 11:41 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : महायुतीतल्या शिवसेना आणि पक्षात या पक्षांमध्ये होणाऱ्या आवक-जावकवरुन सुरू असलेल्या राजकीय वादावर खासदार संजय राऊत यांनी आज जोरदार टीका केलीय. पत्रकारांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमधून कोणी ना कोणी भाजपा किंवा शिंदे यांच्या शिवसेनेत जात असल्याच्या मुद्द्यावर प्रश्न विचारताच राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट लक्ष्य केलं. “शिंदे यांना फक्त एका दिवसाची बातमी हवी असते. याला फोडलं, त्याला पक्षात घेतलं, अशा बातम्या येतात. पण जे त्या पक्षात जातात, त्यांचं पुढे काय होतं, हे कोणी विचारतं का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संजय राऊतांनी मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

दबावाखाली निवडणुका सुरू असल्याचा आरोप : महापालिकेतील वाढत्या बिनविरोध निवडणुकांवरही संजय राऊतांनी परखड भूमिका मांडली. सध्या दबावापोटी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. यावेळी त्यांनी एक उदाहरण देत सांगितलं की, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आई निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या असताना तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नव्हता. तसेच इंदिरा गांधी, राजीव गांधी, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील बिनविरोध निवडून आलेले नाहीत, याची आठवण त्यांनी करून दिली. त्यामुळे बिनविरोध निवडणूक म्हणजे ताकद असतेच असे नाही, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

शरद पवार एनडीएबरोबर जाऊन स्वतःवर डाग लावून घेणार नाहीत - राऊत : महापालिका निवडणुका झाल्यानंतर शरद पवार हे भाजपप्रणीत एनडीएबरोबर जातील, अशा चर्चांना सध्या उधाण आलंय. या चर्चांवर संजय राऊत यांनी शरद पवार या वयात असं काही करतील, असं वाटत नाही. ते एनडीएबरोबर जाणार नाहीत. ते आता असा कोणताही डाग स्वतःवर लावून घेणार नाहीत, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय.

फडणवीसांना त्यांच्या शब्दातच पकडलं; ‘पाप-महापाप’वरून दिला टोला : आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. माध्यम प्रतिनिधींनी फडणवीसांच्या "जो नगरसेवक होतो, तो पाप केलेला असतो, जो महापौर होतो, तो महापाप केलेला असतो.” या विधानावर राऊतांनी मिश्कील पण बोचऱ्या शब्दांत उत्तर दिलंय. “हे वाक्य फडणवीसच म्हणाले, असं म्हणताय ना?” अशी विचारणा त्यांनी पत्रकारांनाच केली. त्यानंतर त्यांनी थेट फडणवीसांच्या राजकीय प्रवासावर भाष्य करत सांगितलं, “फडणवीस नगरसेवक होते, म्हणजे त्यांनी मोठं पाप केलं. त्यानंतर महापौर झाले, म्हणजे अजून मोठं पाप. मग आमदार झाले आणि महापाप करून मुख्यमंत्री झाले,” असा टोला त्यांनी लगावला.

उद्धव–राज ठाकरे मुलाखतीच्या चर्चांदरम्यान राऊतांची राजकीय फटकेबाजी : आज सकाळपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार या तिघांचा उल्लेख करत राजकीय घडामोडींवर सूचक भाष्य केलं. आज संजय राऊत यांनी विविध मुद्दे उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. शिंदेंना फक्त प्रसिद्धीसाठी फोडाफोडीची गरज असते, असं त्यांनी म्हटल्यानंतर आता शिंदेंची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं, महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचाः