ETV Bharat / state

शरद पवार 85 व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर जाणार; महाविकास आघाडीचा पाठिंबा

राज्यसभेच्या माध्यमातून पुढची 6 वर्षे शरद पवार हे राज्यसभेवर काम करतील.

Sharad Pawar
शरद पवार (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 4, 2026 at 6:44 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : 85 वर्षीय शरद पवार हे संसदीय राजकारणात यापुढंही सक्रीय राहणार की निवृत्त होणार? याची उत्सुकता होती. पण आता अखेर शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. 1960 साली महाराष्ट्र विधानसभेत प्रथमच आमदार म्हणून निवडून आल्यापासून आजपर्यंत सातत्यानं लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत राहण्याची कामगिरी शरद पवार यांनी केली आहे. अशी सलग संसदीय कारकीर्द असलेले ते देशातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक मानले जातात. राज्यसभेच्या माध्यमातून पुढची 6 वर्षे शरद पवार हे राज्यसभेवर काम करतील. या निर्णयामुळं राजकीयदृष्ट्या महाविकास आघाडी एकत्र राहील असं नेत्याचं म्हणणं आहे.

महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचं नाव जाहीर : महाराष्ट्रातील 7 उमेदवार राज्यसभेवर निवडून जाणार आहेत. त्यापैकी महायुतीचे 6 आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येईल. भाजपाकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे नेते विनोद तावडे, नागपूरच्या माजी महापौर माया चिंतामण इवनाते आणि रामराव वडकुते यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. शिवसेनेकडून अद्याप नाव जाहीर झालेलं नाही. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळं शरद पवार यांचं नाव आल्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं सांगण्यात येतं. अन्यथा भाजपाकडून 8 वा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी करण्यात आली होती.



काँग्रेस आणि शिवसेनेची (उबाठा) मनधरणी : शरद पवार यांच्या नावाला काँग्रेसचा विरोध होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचं विलीकरण होणार, असं नेत्यांकडून सांगण्यात येत होतं. अजित पवार हयात असताना या चर्चा अंतिम टप्यात असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर शरद पवार यांच्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा सुरु झाली. पण, विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपली भूमिका स्पष्ट करावी, मग आम्ही यावर बोलू अशी भूमिका काँग्रेसनं घेतली होती.

विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबली : आज शरद पवार यांचं नाव जाहीर होण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधानभवनात बोलताना म्हटलं की, "राजसभेच्या जागेची निवडणूक करायची आहे. महाविकास आघाडीच्या बाबतीत सर्वांनी उमेदवार करावा. अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबली आहे. आता ही चर्चा पुढं नेणं शक्य नाही. आम्ही याबाबत कुणाशीही कोणतीही चर्चा करत नाही. दोन्ही बाजूंच्या भावना समजून घेऊन निर्णय घेणारे नेतृत्व सध्या नसल्यामुळं विलीनीकरणाचा विषय पूर्णतः बाजूला पडला आहे. पुढं विलीनीकरणाची कोणतीही शक्यता नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं.

पेच सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट : दरम्यान, राज्यसभेची ही जागा शिवसेनेची आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. पण दुसरीकडे शरद पवार हे राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यामुळं आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत यांच्या बोलण्यातला विसंवाद असल्याचं दिसून आलं होतं. तर मंगळवारी ष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीतील पेच सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाविकास आघाडीला मिळू शकणाऱ्या एकमेव जागेबाबत अद्याप एकमत झालेलं नसताना, शरद पवार यांना आघाडीचा संयुक्त उमेदवार म्हणून पुढं करण्यासाठी राष्ट्रवादीकडून विनंती करण्यात आली. शरद पवार यांच्यामुळं महाविकास आघाडी एकत्र राहील, असं बोललं जात आहे. संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत "काँग्रेसनं महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीबाबत अखेर निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी एकसंध आहे आणि एकत्रच राहणार आहे," असं म्हटलं आहे.


महायुतीकडून आठवले, तावडे यांना संधी : महायुतीनं रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण इवनाते आणि रामराव वडकुते यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचं नाव जाहीर करण्यात आले आहे. रामदास आठवले 1999 पासून रिपाई पक्षाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1995 या काळात ते महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री होते. 1998, 1999 आणि 2004 मध्ये ते मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 2014 मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले असून 2016 पासून ते केंद्रात सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. भाजपाचे विनोद तावडे त्यांनी यापूर्वी महाराष्ट्रात शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री म्हणून काम पाहिलं आहे. ते महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीसही राहिले आहेत. संघ परिवाराच्या जवळचे मानले जाणारे तावडे हे राज्यातील भाजपामध्ये महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात.

माया चिंतामण इवनाते यांचंही नाव जाहीर : नागपूरच्या माजी महापौर माया चिंतामण इवनाते यांचंही नाव जाहीर करण्यात आलं आहे. माया इवनाते या 2007 ते 2009 या काळात त्यांनी नागपूरच्या महापौरपदाची जबाबदारी सांभाळली. शहर व राज्य पातळीवर त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. आदिवासी कल्याण क्षेत्रात सक्रिय असलेल्या इवनाटे यांनी अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाच्या सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. रामराव वडकुते हे चौथे उमेदवार आहेत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार (विधानपरिषद) आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. 2021 मध्ये त्यांची हिंगोली जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

हेही वाचा :

  1. 'अजितदादांच्या अपघाताआधी ‘रेकी’?, एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात विमान पाडण्याची मिळाली होती धमकी'- रोहित पवारांचा दावा
  2. भाजपाकडून महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि विनोद तावडे राज्यसभेवर जाणार
  3. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबलीय, सध्या विलीनीकरणाचा प्रश्नच नाही - जयंत पाटील