जळगावात शरद पवारांच्या स्वागताला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; पगडी घालून केला सन्मान, चर्चेला उधाण!
जळगावात एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं स्वागत करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष विमानतळावर एकत्र आले.

Published : August 30, 2026 at 4:19 PM IST
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यासाठी जळगावात दाखल झाले. पवार यांच्या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, जळगाव विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकाच ठिकाणी एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याविषयीच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
शरद पवार यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं विमानतळावर उपस्थित होते. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी स्वतः शरद पवार यांचं स्वागत करत त्यांना पगडी घालून त्यांचा सन्मान केला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शरद पवार यांचं स्वागत केल्यानं या प्रसंगाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालं. पवार विमानतळावर दाखल होताच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘शरद पवार जिंदाबाद’ तसेच ‘अजित पवार अमर रहे’ अशा घोषणा दोन्ही पक्षाकडून दिल्या गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर एकमेकांपासून राजकीय अंतर ठेवणारे दोन्ही गट जळगाव विमानतळावर एकाच नेत्याच्या स्वागतासाठी एकत्र आल्याने उपस्थितांमध्येही या घडामोडीची मोठी चर्चा रंगली होती.
राजकीय समीकरणांकडे सर्वांचं लक्ष
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. ‘महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जे काही चांगले होतं, ते जळगावातून होतं,’ असं सूचक विधान संजय पवार यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा राजकीय अर्थ काढला जात असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये भविष्यात काही राजकीय समीकरणं जुळण्याची शक्यता आहे का, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष अशी विभागणी झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात दोन्ही पक्षांकडून परस्परांवर टीका होताना दिसून आली आहे. मात्र, जळगावात शरद पवार यांच्या स्वागतासाठी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र आल्यानं स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडूनही दोन्ही गटांची विचारधारा एकच असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे वैचारिक पातळीवर असलेली जवळीक आणि स्थानिक राजकारणातील बदलती समीकरणं यामुळे भविष्यात दोन्ही गटांमध्ये संवाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या स्वागताच्या प्रसंगावरून थेट राजकीय युती किंवा दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येणार असल्याचा निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल, असंही राजकीय जाणकारांचं मत आहे.
एकनाथ खडसे यांचा 75वा वाढदिवस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर येथे अमृत महोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी राज्यातील विविध राजकीय पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जळगाव जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे खडसे यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं जळगाव जिल्ह्यात राजकीय नेत्यांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे.
एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती, त्यात शरद पवारांचं जळगावात आगमन आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांचा एकत्रित स्वागत सोहळा यामुळे जळगावच्या राजकीय पटलावर नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आता या जवळकीचं रूपांतर प्रत्यक्ष राजकीय समीकरणात होतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :

