ETV Bharat / state

शाहू महाराजांनी इंग्लंडहून मागवलेले पोलादी गर्डल्स भंगारात; कोल्हापुरातील शाहूप्रेमी संतप्त, हेरिटेज समिती करणार पाहणी

आगीत जळालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीदरम्यान शाहू महाराजांनी इंग्लंडहून मागवलेले ऐतिहासिक पोलादी गर्डल्स भंगारात विकल्याचं उघडकीस आल्यानं कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे.

Keshavrao Bhosale Natyagruh
राजर्षी शाहू खासबाग मैदानातील व्यासपीठाच्या पुर्नउभारणीचं काम सुरू आहे. (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 1, 2026 at 5:00 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर : रोममधील मैदानाच्या धर्तीवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1915 साली कोल्हापुरात उभारलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदानाच्या व्यासपीठाला दोन वर्षांपूर्वी भीषण आग लागली. या आगीत नाट्यगृह आणि व्यासपीठाचा काही भाग आगीच्या भक्षस्थानी पडल्यानं हा ऐतिहासिक वारसा नष्ट झाला. राज्य सरकारनं 25 कोटींचा निधी देऊन नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू केलं. यातील व्यासपीठासाठी शाहू महाराजांनी इंग्लंडहून मागवलेल्या पोलादी गर्डल्सचा पुनर्वापर न करता ते विकल्याचं उघड झालं आहे. या गंभीर प्रकारावर शाहू प्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा ऐतिहासिक वारसा खोडून काढण्याचं कारस्थान करणाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचा निर्धार कोल्हापुरातील शाहू प्रेमींनी केला आहे.

अधिकाऱ्यांना काम जमत नसेल तर आम्ही करू : "कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाचं केंद्र असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला 8 ऑगस्ट 2024 रोजी आग लागली. या आगीत नाट्यगृह जळून खाक झालं. तर लागूनच असलेल्या खासबाग कुस्ती मैदानाच्या व्यासपीठाचंही नुकसान झालं होतं. राज्य सरकारनं तातडीनं 25 कोटीचा निधी नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी दिला होता. सध्या नाट्यगृहाचं काम सुरू आहे. नाट्यगृहाचा मूळ ढाचा कायम ठेवत पुनर्बांधणी व्हावी, अशी मागणी रंगकर्मी आणि कुस्तीप्रेमींनी केली होती. मात्र, याला हरताळ फासत खासगी ठेकेदारानं ज्या गर्डल्सवर खासबाग कुस्ती मैदानाचं व्यासपीठ उभं होतं. याच व्यासपीठावर बालगंधर्व, केशवराव भोसले यांनी आपली कला सादर केली. त्याच व्यासपीठाचे गर्डल्स विमा कंपनीच्या सूचनेनुसार भंगारात विकण्याची बाब शाहूनगरी असलेल्या कोल्हापूरसाठी लज्जास्पद आहे. हे कृत्य करणाऱ्यावर तत्काळ कारवाई करा. निधीमध्ये ढपला पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना काम जमत नसेल तर आम्ही लोकवर्गणीतून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा ऐतिहासिक वारसा जपू," अशी प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस अशोक पवार यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया देताना इंद्रजित सावंत आणि अशोक पवार (ETV Bharat Reporter)

ऐतिहासिक वस्तू परत आणा, या प्रकरणाची चौकशी करा : "राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात उभारलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला पॅलेस थिएटर असं पूर्वी नाव होतं. नाट्यगृह आणि खासबाग मैदान या ठिकाणी स्वतः छत्रपती शाहू महाराज रंगकर्मींची कला आणि पैलवानांची कुस्ती पाहण्यासाठी उपस्थित असायचे. मात्र, याच केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामात अनेक ऐतिहासिक वस्तू लिलाव पद्धतीनं विकल्या गेल्या आहेत. तत्काळ या वस्तू परत आणाव्यात आणि राजर्षी शाहू महाराजांच्या ऐतिहासिक वास्तूची पुनर्बांधणी करावी," अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली.

कोल्हापुरातील हेरिटेज कमिटी पाहणी करणार : "संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यानंतर राज्य सरकारच्या पुढाकारानं या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र, ऐतिहासिक आणि हेरिटेज वास्तू असलेल्या या इमारतीच्या वस्तू विकल्या गेल्याचा प्रकार समोर आल्यानंतर गुरुवारी (दि.2) कोल्हापुरातील हेरिटेज समितीकडून पाहणी करण्यात येईल," अशी माहिती कोल्हापूर हेरिटेज समितीच्या अमरजा निंबाळकर यांनी दिली.

हेही वाचा :

  1. इंजिनिअर तरुणाची कमाल! अवघ्या 11 हजारांत तयार केली सौरऊर्जा आणि बॅटरीवर चालणारी तीनचाकी; पेट्रोल खर्च झाला शून्य
  2. उबाठा सोडल्यानंतर सचिन अहिर यांना लागली लॉटरी: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती निवड
  3. महायुतीचा ठाकरेंना मोठा धक्का; 'कॅप्टन ठाकरें'नी आत्मपरीक्षण करावं, बच्चू कडूंचा सल्ला!