साताऱ्यातील मल्हारपेठ पोलिसांचा मोठा कारनामा; गुटख्याची कारवाई दडपण्यासाठी 8 लाखांची तोड, पोलीस अधीक्षकांनी सुरू केली चौकशी
गुटखा जप्त केल्यानंतर प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी लाखो रुपयांची तोड केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणाची सध्या गोपनीय चौकशी सुरू आहे.

Published : June 3, 2026 at 3:43 PM IST
सातारा - पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलिसांचा मोठा कारनामा उघडकीस आला आहे. गुटखा जप्तीची कारवाई दडपून पोलिसांनी 8 लाख रुपयांची तोड केल्यानं जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील गोपनीय माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे कारवाई दडपण्यासाठी केलेली अर्थिक तडजोड कुणा कुणाच्या अंगलट येणार, याकडे पोलीस दलाचं लक्ष लागलं आहे.
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलिसांनी चार दिवसांपूर्वी आपल्या हद्दीतील एका गावात कारवाई करून गुटखा जप्त केला होता. मात्र, पोलिसांनी कारवाईची माहिती वरिष्ठांना दिली नाहीच. शिवाय रितसर गुन्हा दाखल न करता प्रकरण दडपण्यासाठी संशयिताकडून 8 लाख रुपयांची तोड केली. हे तोडपाणी एकट्या पोलिसाने केलंय की बाकीचेही त्यात सामील आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पोलिसांनी केलेल्या तोडपाण्याचे भांडे फुटले आणि त्याची माहिती थेट पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यापर्यंत पोहोचली. या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी गुप्तपणे चौकशी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, पाटण उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील यांच्याकडे आहे. त्यांच्या कानावर देखील पोलिसांच्या कारनाम्याची चर्चा गेली आहे. मात्र, त्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसल्याचं सांगत त्यांनी कानावर हात ठेवले.
गुन्हा दाखल न करण्यासाठी जी अर्थिक तोड झाली आहे, त्यापैकी एका कर्मचाऱ्याच्या नावाची खासगीत जोरदार चर्चा आहे. तसंच अनेक प्रकरणात तो पोलीस बदनाम असल्याची माहितीही चर्चेतून समोर येत आहे. 2024 सालाच्या अखेरीस शामगाव घाटात दोन दुचाकींचा अपघात झाला होता. त्यात पुसेगावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. प्राणी आडवा आल्याने अपघात झाल्याचं दाखवून मसूर पोलिसांनी कुणाला तरी वाचवलं होतं, अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे.
पाटण तालुक्यातील प्रकरणाबद्दलच्या माहितीसाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्हाला देखील गोपनीय माहिती मिळाली आहे. त्यानुसार चौकशी सुरू केली आहे. चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांवर निश्चित कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. दरम्यान, स्वतः एसपींनीच पोलिसांच्या कारनाम्याची दखल घेतल्यानं मल्हारपेठ पोलिसांचं चांगलंच धाबं दणाणलं आहे.
हेही वाचा...

