ETV Bharat / state

महापालिका निवडणूक जाहीरनाम्यासाठी भाजपाची भन्नाट आयडिया; क्यूआर कोड स्कॅन करून सूचना, तक्रारी नोंदवण्याचं आवाहन

राज्यात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. भाजपाने नागपुरात क्यूआर कोड स्कॅन मोहीम राबवली आहे.

QR code
भाजपाचा क्यूआर कोड उपक्रम (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 24, 2025 at 6:44 PM IST

|

Updated : December 24, 2025 at 8:22 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीची भाजपाकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. उमेदवार यादीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून जाहीरनामा तयार करण्याचं काम देखील सुरू करण्यात आलं आहे. मात्र, भाजपाचा हा जाहीरनामा जनतेच्या सूचनांच्या आधारेच तयार केला जाणार आहे. त्यासाठी पुढील एक ते दोन दिवसामध्ये शहरात जागोजागी 'क्यूआर कोड'चे स्टँड लावले जाणार असल्याची माहिती, आमदार प्रवीण दटके (Pravin Datke) यांनी दिली. सुमारे 5 लाख सूचना या माध्यमातून येतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.

'क्यूआर कोड' शहरात लावले जाणार : नागपूर महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नाही, त्यामुळं उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घाई उमेदवारांमध्ये दिसत नाही. उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यापूर्वी भाजपाने थेट नागपूरच्या लोकांकडूनच जाहीरनाम्यासाठी सूचना मागवण्यास सुरुवात केलीय. यामध्ये नागरिक आपल्या सूचना आणि तक्रारी नोंदवू शकणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 'क्यूआर कोड'चं उद्घाटन करण्यात आलं, असून येत्या एक ते दोन दिवसात क्यूआर कोड शहरात लावले जाणार आहेत.

प्रतिक्रिया देताना आमदार प्रवीण दटके (ETV Bharat Reporter)



पाच लाख लोकांकडून सूचना येणार : नागपूर शहरातील चौका-चौकात, बस स्थानक, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बाजार, आठवडी बाजार, सलून यासह गर्दीच्या ठिकाणी हे क्यूआर कोड लावले जाणार आहेत. सुमारे 5 लाख लोकांकडून सूचना आणि तक्रारी प्राप्त करून घेण्याचं उद्धिष्ट भाजपाने ठेवलं आहे.



'या' विषयांचा आहे समावेश : नागपुरातील नागरिक हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्यात आपलं मत आणि तक्रारी नोंदवू शकणार आहेत. प्रामुख्याने शहरातील आणि प्रभागातील रस्ते, पाणी, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षा, स्मार्ट सिटी या सारख्या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.



भाजपाची समिती करणार विचारमंथन : 31 डिसेंबरपर्यंत लोकांच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर भाजपाची समिती सूचनांचे संकलन करून अभ्यास करेल आणि त्यानंतर नागरीकांचे प्रश्न आणि मागण्यांचा समावेश जाहीरनाम्यात केला जाईल अशी माहिती, आमदार प्रवीण दटके यांनी दिली.



भाजपाची पहिली यादी 28 डिसेंबरनंतरच : भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी वर्षाच्या शेवटी जाहीर केली जाणार आहे. बंडखोरीची डोकेदुखी टाळण्यासाठीच भाजपाने यादी उशिरा जाहीर करण्याचं निश्चित केलं आहे.


युती आणि आघाडीचा निर्णय नाही : महानगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, आद्यपही महायुती आणि महाविकास आघाडी झालेली नाही, त्यामुळं मोठ्या राजकीय पक्षांवर अवलंबून असलेल्या प्रादेशिक राजकीय पक्षांचं गणित जुळता जुळतच नसल्याचं चित्र बघायला मिळत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक निकालात भाजपाने राज्यभरात आपला डंका वाजवला असल्यानं महायुतीतील घटक पक्षांना भाजपाची साथ हवी आहे. तर दुसरीकडं काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीचे घटक पक्षसुद्धा हाकेला ओ कधी मिळेल याची वाट बघत आहेत.



जास्त जागांच्या आग्रहामुळं अडलं जागावाटप : नागपुरात महायुती व्हावी, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष आग्रह आहे. त्यामुळंच आमचे वरिष्ठ नेते देखील विशेष प्रयत्नही करत आहेत. जर मित्र पक्षांनी जागासंदर्भात सामंजस्य दाखवले तर निश्चित नागपुरात महायुती होईल अशी माहिती प्रवीण दटके यांनी दिली. त्या संदर्भात सध्या नागपुरात मित्र पक्षांसोबत महायुतीसाठीची चर्चा सुरू झालेली आहे. आमचे सर्व वरिष्ठ नेते महायुती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मित्र पक्षांचा जास्त जागांचा आग्रह असल्यानं जागा वाटपाचा निर्णय रखडला असल्याचं दटके म्हणाले.

हेही वाचा -

  1. भाजपाला धडा शिकवण्यासाठी, मुंबईत सुरू असलेली लूट थांबवण्यासाठी ठाकरे बंधु एकत्र - संजय राऊत
  2. काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचा भाजपाच्या प्रवक्त्याचा दावा; रॉबर्ट वाड्रा यांनी नेमकं काय म्हटलं?
  3. "ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब होईल"-सतेज पाटील
Last Updated : December 24, 2025 at 8:22 PM IST