सतेज पाटलांना हुकूमशाहीने काम करण्याची सवय, खासदार महाडिकांची टीका तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार 'मिसळकट्टा'
निवडणूक सुरू होण्याअगोदरच आमदार सतेज पाटलांनी काही उमेदवारांना दम देण्यास सुरुवात केलीय, त्यांच्या या हुकूमशाहीमुळे राष्ट्रवादीसुद्धा त्यांच्यापासून दुरावल्याची टीका भाजप खासदार धनंजय महाडिकांनी केलीय.

Published : January 2, 2026 at 11:05 AM IST
|Updated : January 2, 2026 at 5:01 PM IST
कोल्हापूर- कोल्हापूर महानगरपालिकेच्या निमित्ताने काँग्रेस आणि भाजपा पुन्हा आमनेसामने येत आहेत. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या टीकेला उत्तर देण्याची आता गरज नाही, ते आता सैरभैर झालेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांनी तीन ठिकाणी पत्नीला उमेदवारी दिली यावरून यांच्याकडे उमेदवार नाहीत हे स्पष्ट होतं, विरोधकांवर मी बोलण्याची गरज नाही. एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीने काम करण्याची त्यांची सवय आहे. निवडणूक सुरू होण्याअगोदरच आमदार सतेज पाटील यांनी काही उमेदवारांना दम देण्यास सुरुवात केलीय हे सगळ्यांनी पाहिले त्यांच्या या हुकूमशाहीमुळे राष्ट्रवादीसुद्धा त्यांच्यापासून दुरावली असल्याची टीका भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केली. धनंजय महाडिक कोल्हापुरात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
81 उमेदवारांचं मजबूत पॅनल उभं करण्यात आलंय : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी अभूतपूर्व महायुती झालीय, 81 उमेदवारांची निवड करण्यात आलीय, काहींनी वेगळे फॉर्म भरलेले आहेत, त्यांनाही थांबवण्याचा प्रयत्न होणार आहे आणि 81 उमेदवारांचं मजबूत पॅनल उभं करण्यात आलंय. आज या सर्व उमेदवारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आलीय, यामध्ये आचारसंहितेचे पालन, खर्चाचं नियोजन, प्रचार कशा पद्धतीने करावा, प्रचाराचे मुद्दे कोणते असावे या सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी महायुतीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्यासह सर्व नेते या उमेदवारांना भेटणार आहेत. 10 वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आणि अनेकांवर अन्याय झालेला आहे. आम्ही या नाराजांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे, मनधरणी केलेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला यश आले आहे, असंही धनंजय महाडिक म्हणालेत.
मुख्यमंत्र्यांचा एक तासाचा टॉक शो घेण्यात येणार : कोल्हापुरात काँग्रेसचे नेते हे प्रत्येक निवडणुकीत एक स्लोगन काढतात आणि लोकांना फसवतात. नेहमी जे चालतं ते या निवडणुकीत चालणार नाही, त्यांनी काढलेल्या टॅगलाईनला आम्ही उत्तर देणे हे क्रमप्राप्त होतं, त्यांना उत्तर दिलेलं आहे. भविष्यात ते जे बोलतील त्याला उत्तर दिलं जाणार आहे, 12 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरला वेळ दिलेली आहे. पारंपरिक पद्धतीने सभा किंवा रोड शो न घेता मिसळ कट्टा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, मुख्यमंत्र्यांचा एक तासाचा टॉक शो घेण्यात येणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी दिलीय.
गजा मारणेच्या पत्नीला राष्ट्रवादीचे तिकीट, मंत्री मुश्रीफांचं समर्थन : पुणे महानगरपालिकेत पक्षाने गुंडांना तिकीट दिल्याचं मी काही ऐकलेलं नाही, पण घरातील काही महिलांना तिकीट दिलंय. आता महिला सक्षम असल्यास त्यांच्यावर आरोप झाले असतील, पण गुन्हा सिद्ध झालेला नाही, अशा काळात एखाद्या महिलेचा सन्मान करायचा, आरोप असणं वेगळं आणि गुन्हा सिद्ध होणे यात फार मोठा फरक असल्याचं म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कृतीचं समर्थन करण्यात आलंय, तर मग कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांची युती आहे. मात्र उबाठामधील काही नेत्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केलीय, यावर बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, काँग्रेस आणि ठाकरे गटाची आघाडी झाल्यानंतरसुद्धा सतेज पाटील यांच्यावर टीका होते हेच माझ्या मित्राचं वैशिष्ट्य असल्याचा टोलाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावलाय.

