साताऱ्यात एनडीआरएफची तुकडी दाखल; कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 5 टीएमसीनं वाढ
पश्चिम घाटातील मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं आहे.


Published : July 7, 2026 at 10:57 AM IST
सातारा - मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटन, वाहतूक व्यस्थेला आणि शाळा-महाविद्यालांना ब्रेक लागला आहे. जनजीवन सुरळित करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं असून एक तुकडी कराडमध्ये दाखल झाली आहे.
पश्चिम घाटमाथ्याला ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानं पाच तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना आजदेखील सुट्टी देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद 93 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे एका रात्रीत पाणीसाठा 5 टीएमसीनं वाढला आहे. कोयना आणि कृष्णा नद्यांची पाणी पातळीही झपाट्यानं वाढत आहे.

नागरिकांचे स्थलांतर - सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे वेण्णा नदीला पूर आला आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे पडझडीचं सत्र सुरू झालं आहे. वादळी वाऱ्याचा वेगदेखील मोठा आहे. वाऱ्यामुळे एका शाळेवरील पत्रे उडून गेले आहेत. भूस्खलन होऊन दरडी कोसळत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे.

एका रात्रीत पाणीसाठा 5 टीएमसीनं वाढला -कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्यानं एका रात्रीत पाणीसाठा 5 टीएमसीनं वाढला आहे. सध्या धरणात 30.58 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या चोवीस तासात महाबळेश्वरमध्ये 400 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनानगरला 319 तर नवजामध्ये 276 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात प्रतिसेकंद 93 हजार क्युसेक्स वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.

आंबेनळी घाट महिनाभरासाठी बंद- कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आंबेनळी घाट अति धोकादायक बनला आहे. घाटात सातत्याने दरडी कोसळत आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा घाट काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पश्चिम घाटात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आंबेनळी घाट महिनाभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा-

