विचार काय हाय तुमचा? एकनाथ शिंदेंच्या हातात हात घालून रामराजे निंबाळकर शिवसेनेच्या मंचावर!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार रामराजे निंबाळकर हे हजर राहिल्यानं विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Published : November 28, 2025 at 9:51 PM IST
|Updated : November 28, 2025 at 10:42 PM IST
सातारा- नगरपालिका निवडणुका सुरू असताना फलटणमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) विधानपरिषदेचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेच्या व्यासपीठावर दिसले. निवडणूक जाहीरनाम्याच्या प्रकाशनानंतर दोघांनी एकमेकांचा हात उंचावला. त्यामुळे रामराजे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.
रामराजेंचे सुपुत्र अनिकेतराजे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. ते फलटणच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. अनिकेतराजेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पॅनेल रिंगणात आहे. फलटण तालुक्यात रामराजे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर तसेच मंत्री जयकुमार गोरे यांच्यात विळा-भोपळ्याचं सख्ख्य आहे. रामराजेंनी आपल्या मुलाला नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आणताच रणजितसिंह निंबाळकरांनी आपले भाऊ समशेरसिंह यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे फलटण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.
विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?विधानसभा निवडणुकीत फलटणची जागा राष्ट्रवादीची असल्यानं महायुतीच्या फॉर्म्युलानुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात आली. त्याचवेळी रणजितसिंह निंबाळकरांनी राजकीय खेळी करून त्यांचे कट्टर समर्थक सचिन कांबळे-पाटील यांना राष्ट्रवादीत पाठवले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना उमेदवारीही दिली. पक्षाचे विधानपरिषद आमदार असूनही रामराजे निवडणूक काळात तटस्थ होते. रामराजेंचे चुलत बंधू संजीवराजे आणि तत्कालीन आमदार दीपक चव्हाण हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पुन्हा दीपक चव्हाण यांनाच उमेदवारी दिली. महायुतीचे सचिन कांबळे पाटील यांनी दीपक चव्हाण यांचा पराभव केला.
रामराजेंनी नेमका कोणता संदेश दिलाय- फलटण तालुक्यात रणजितसिंह निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासकीय दहशत निर्माण केली असल्याचा आरोप रामराजे वारंवार करत होते. त्यांच्या चुकीच्या कामांना राज्यातील भाजपा नेतृत्वानं पाठबळ देऊ नये, अशीही रामराजेंची मागणी होती. त्यामुळे महायुतीत असूनही रामराजे आणि निंबाळकर-गोरे यांच्यात संघर्ष पेटत राहिला. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं रामराजेंनी वेगळाच पवित्र घेतला. थेट धनुष्यबाण चिन्हावरच त्यांनी पॅनल उभे केलं आहे. काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादीतच राहायचं की दुसऱ्या पक्षात जायचं ते मला कळतं. तेवढी माझी अजून बुद्धी चालते. त्यामुळे मुलाच्या प्रचार सभेत शिवसेनेच्या मंचावर जात आणि एकनाथ शिंदेंच्या हातात हात घालून रामराजेंनी नेमका कोणता संदेश दिलाय? याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
हेही वाचा-

