ETV Bharat / state

'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात देहू नगरी दुमदुमली! संत तुकाराम महाराजांच्या 341 व्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडं प्रस्थान

देहू नगरीतून संत तुकाराम महाराजांच्या 341 व्या पालखी सोहळ्याने 7 जुलैला दुपारी पंढरपूरकडं प्रस्थान केलं. संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत हजारो वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

SANT TUKARAM MAHARAJ PALKHI
जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 7, 2026 at 4:40 PM IST

|

Updated : July 7, 2026 at 8:22 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

देहू (पुणे) : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 341 वा पालखी प्रस्थान सोहळा मंगळवारी (दि.7) देहू नगरीत भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीनं दुपारी 2.30 वाजता पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं. पहाटेपासूनच धार्मिक विधी, पूजा आणि कीर्तनाच्या कार्यक्रमांनी देहू नगरी दुमदुमून गेली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी मोठ्या संख्येनं देहूत दाखल होण्यास सुरुवात झाले होते. संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीची महापूजा : पहाटे पाच वाजता संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात पालखी सोहळा प्रमुख आणि मंदिर विश्वस्त यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी साडेपाच वाजता संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीची महापूजा विधिवत पार पडली. देहू ते पंढरपूर हा पालखी सोहळा अखंड सुरू ठेवण्यामध्ये नारायण महाराजांचे मोठं योगदान मानलं जातं. त्यामुळं त्यांच्या समाधीस्थळीही भाविकांनी मोठी गर्दी केली.

'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात देहू नगरी दुमदुमली! (ETV Bharat Reporter)

प्रस्थान सोहळ्यापूर्वीच वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी : सकाळी 9 ते 11 या वेळेत संत तुकाराम महाराजांच्या आजोळ असलेल्या इनामदार वाड्यात पादुकांची महापूजा झाली. त्यानंतर सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत सप्ताह काल्याचं कीर्तन करण्यात आलं. अभंग, हरिनाम आणि कीर्तनामुळं संपूर्ण देहू नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. प्रस्थान सोहळ्यापूर्वीच वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली होती, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि 'ज्ञानोबा-तुकोबा'च्या जयघोषानं देहू नगरी दुमदुमून गेली. यंदाच्या पालखी सोहळ्यानिमित्त संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसर रंगीबेरंगी फुलांनी सजवल्यानं भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. मंदिरात दर्शनासाठी वारकऱ्यांच्या रांगा लागल्या असून, प्रशासनानं दर्शन आणि पालखी सोहळ्याचं नियोजन सुयोग्य पद्धतीनं केलं आहे.

इंद्रायणी नदीत स्नान करण्यास मज्जाव : यंदाच्या वारीवर मुसळधार पावसाचा परिणाम दिसून येत आहे. देहूतील पवित्र इंद्रायणी नदीला पूर आला आहे. नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं वारकऱ्यांना इंद्रायणी नदीत स्नान करण्यास यंदा मज्जाव करण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं नदीकिनारी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कोणालाही नदीपात्रात किंवा नदीकाठी जाण्याची परवानगी दिलेली नाही. प्रशासन, पोलीस आणि स्वयंसेवकांकडून वारकऱ्यांना सातत्यानं सुरक्षासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे. इंद्रायणी नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळं कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. आळंदीत इंद्रायणीला महापूर, सद्यस्थितीत वारकऱ्यांनी आळंदीत येऊ नये; देवस्थान अन् पोलीस यंत्रणा सतर्क
  2. आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली; कोट्यवधींचा खर्च करूनही वारकऱ्यांच्या नशिबी प्रदूषित पाणी
  3. कृष्णा नदीच्या वाढत्या पाण्यामुळे नृसिंहवाडीत पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
Last Updated : July 7, 2026 at 8:22 PM IST