आठवीत सुचली कल्पना, आज 10 कोटींहून अधिक व्ह्यूज; एसटी प्रवाशांसाठी विकसित केली QR कोड प्रणाली
कोपरगावच्या साईश्रद्धा (Saishraddha) सालमुठेनं एसटी प्रवाशांसाठी QR कोड आणि वेबसाइट प्रणाली विकसित केलीय. याबाबत 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी रवींद्र महाले यांचा हा खास रिपोर्ट

Published : August 26, 2026 at 6:51 PM IST
|Updated : August 27, 2026 at 2:50 PM IST
शिर्डी : वय लहान असलं तरी ध्येय मोठं असेल आणि त्याला मेहनत, जिद्द कल्पकतेची जोड मिळाली, तर कोणतंही काम अशक्य नसतं. हे कोपरगाव येथील संजीवनी ज्युनिअर कॉलेजमध्ये (Sanjeevani Junior College) इयत्ता बारावीचं शिक्षण घेणाऱ्या 'साईश्रद्धा सालमुठे' (Saishraddha Salmuthe) हिनं आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवलं. एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी तिनं आधुनिक QR कोड आणि वेबसाइट प्रणाली विकसित केलीय. या माध्यमातून प्रवाशांना बसचं वेळापत्रक, बसचा प्रकार, प्रवासाचं अंतर, मार्ग आणि इतर महत्त्वाची माहिती सहज उपलब्ध होत आहे. तिच्या या नाविन्यपूर्ण कार्याची दखल राज्यातील संबंधित मंत्र्यांनी घेत तिचं कौतुक केलं असून, तिच्या पुढील उच्च शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केलीय.

QR कोडचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग : साईश्रद्धाला इयत्ता आठवीत शिकत असतानाच QR कोडविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली. QR कोड नेमका कसा तयार होतो, त्यामागील तंत्रज्ञान काय आहे आणि त्याचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग कसा करता येईल, याचा तिनं स्वतः अभ्यास सुरू केला. सुरुवातीला कोणतेही विशेष प्रशिक्षण नसताना तिनं ट्रायल-अँड-एरर पद्धतीनं विविध प्रयोग केले. हळूहळू या विषयातील तिची उत्सुकता वाढत गेली आणि त्यातूनच एसटी प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल असा डिजिटल प्रकल्प साकारण्याची कल्पना तिच्या मनात आली.
वेबसाइटवर 10 कोटींहून अधिक व्ह्यूज : QR कोड तयार केल्यानंतर त्यामध्ये प्रवाशांना आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून देण्यासाठी वेबसाइटची आवश्यकता होती. यासाठी साईश्रद्धाने संजीवनी युनिव्हर्सिटीच्या संगणक विभागाचे प्रमुख सचिन जाधव यांचं मार्गदर्शन घेतलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळं तिच्या कल्पनेला तांत्रिक स्वरूप मिळालं. सातत्यानं मेहनत घेत तिनं 2023 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही प्रणाली विकसित केली. सुरुवातीला या वेबसाइटला दरमहा सुमारे 50 हजार व्ह्यूज मिळत होते. मात्र, प्रणालीचा वापर वाढत गेल्यानं तिची लोकप्रियता झपाट्यानं वाढली. 2024-25 दरम्यान वेबसाइटच्या व्ह्यूअरशिपमध्ये मोठी वाढ झाली असून, आता या वेबसाइटने 10 कोटींहून अधिक व्ह्यूजचा टप्पा ओलांडल्याचं तिनं सांगितलं.

प्रकल्पामागील मुख्य उद्देश काय? : रेल्वे प्रवाशांना गाड्यांची माहिती उपलब्ध करून देणाऱ्या ‘Where is My Train’ या ॲपच्या धर्तीवर एसटी प्रवाशांनाही बसची आवश्यक माहिती एका क्लिकवर मिळावी, हा साईश्रद्धाच्या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. तिनं विकसित केलेल्या QR कोड प्रणालीमुळं बस डेपोतून सुटणाऱ्या बसची वेळ, बसचा प्रकार, प्रवासाचे एकूण अंतर तसंच बसचा संपूर्ण प्रवासमार्ग याबाबत माहिती मिळणं सोपं झालं आहे. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध सुविधा, संपर्क फॉर्म आणि एसटी महामंडळाच्या विविध महत्त्वाच्या सूचना वेबसाइटवर नियमितपणे अपडेट केल्या जातात. सध्या ही प्रणाली अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून, भविष्यात तिचा विस्तार इतर जिल्ह्यांमध्येही होण्याची शक्यता आहे.

साईश्रद्धाची एसटी महामंडळ दूत नियुक्ती : साईश्रद्धाने नुकतीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या प्रकल्पाचं सविस्तर सादरीकरण केलं. कमी वयात विद्यार्थिनीने विकसित केलेली ही प्रणाली पाहून मंत्र्यांनी तिचं विशेष कौतुक केलं. सादरीकरणानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्र्यांनी साईश्रद्धाची एसटी महामंडळाची दूत म्हणून अधिकृत नियुक्ती करण्याची घोषणा केली. एवढंच नव्हे, तर तिच्या पुढील संपूर्ण उच्च शिक्षणाचा खर्च स्वतः उचलणार असल्याचंही जाहीर केलं. त्यामुळं साईश्रद्धाच्या या कामाची राज्यस्तरावर मोठी दखल घेतली गेली आहे.

मला कोणताही मोबदला नको : साईश्रद्धाच्या कार्याने प्रभावित झालेल्या मंत्र्यांनी तिला या प्रकल्पाचा मोबदला म्हणून काय अपेक्षित आहे, अशी विचारणा केली. मात्र, साईश्रद्धाने अत्यंत नम्रपणे कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नसल्याचं सांगितलं. “मला कोणताही मोबदला नको. मला माझ्या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी हे काम करायचं आहे,” अशी भावना तिनं व्यक्त केली. तिच्या या निःस्वार्थ वृत्तीचं आणि सामाजिक बांधिलकीचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

साईश्रद्धा लहानपणापासूनच जिज्ञासू : साईश्रद्धाचे वडील नामदेव सालमुठे हे रयत बँकेतील निवृत्त अधिकारी असून, आई संगीता अरविंद सालमुठे गृहिणी आहेत. मुलगी लहानपणापासूनच चुणचुणीत, जिज्ञासू आणि उपक्रमशील असल्याचं तिचे पालक सांगतात. साईश्रद्धाने बस प्रवाशांसाठी QR कोड प्रणाली विकसित करण्याची कल्पना मांडली. त्यावेळी सुरुवातीला पालकांनी तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. “अगोदर अभ्यास पूर्ण कर, इंजिनिअरिंग झाल्यानंतर असे प्रकल्प कर,” असं त्यांनी तिला सांगितलं होतं. मात्र, साईश्रद्धाने पालकांच्या अपेक्षांचा आदर राखत अभ्यासासोबतच या प्रकल्पावरही मेहनत सुरू ठेवली. वेळ मिळेल तेव्हा संगणकावर काम करून तिनं विविध प्रयोग केले. अखेर तिच्या जिद्दीला यश आलं आणि तिनं हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारून दाखवला.
नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद : आई संगीता सालमुठे यांच्या म्हणण्यानुसार, आठवी ते दहावीच्या काळात आयटीच्या तासांमध्ये साईश्रद्धा संगणकावर या प्रकल्पासाठी परिश्रम घेत होती. सुरुवातीला तिचं अभ्यासाकडं दुर्लक्ष होऊ नये आणि ती सतत मोबाइल लॅपटॉपमध्ये गुंतून राहू नये, या काळजीपोटी पालकांनी शाळेत जाऊन तिला मोबाइल लॅपटॉप देऊ नये, अशी विनंतीही केली होती. मात्र, शिक्षक आणि महाविद्यालय प्रशासनाने तिच्यातील कौशल्य ओळखलं. तिच्या कल्पकतेला योग्य दिशा देत तिला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन दिलं. आज तिच्या या प्रकल्पाला एसटी महामंडळ, प्रवासी आणि नागरिकांकडून मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद पाहता पालकांचा आनंद आणि अभिमान गगनात मावेनासा झाला आहे.
आयआयटी मुंबई, दिल्ली संस्थांमध्ये सहभागी होण्याची संधी : साईश्रद्धाची तांत्रिक क्षमता, अभ्यासातील प्रगती आणि संशोधनाची आवड लक्षात घेऊन संजीवनी ज्युनिअर कॉलेजने तिला इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी 100 टक्के शिष्यवृत्ती दिली. संस्थेच्या माध्यमातून तिला आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी जोधपूर यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. तसंच विविध पारितोषिके आणि उपक्रमांच्या माध्यमातून तिच्या कौशल्याला प्रोत्साहन मिळालं. संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स व संस्थांच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. मनाली कोल्हे यांनी साईश्रद्धाच्या कार्याचं कौतुक केलंय.
इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी : इयत्ता आठवीत असतानाच साईश्रद्धानं आपल्या कल्पकतेतून संशोधनात्मक आणि सामाजिक उपयोगाचा प्रकल्प हाती घेतला. कमी वयात तिनं दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि तंत्रज्ञानाची आवड इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं डॉ. मनाली कोल्हे यांनी सांगितलं. या प्रकल्पासाठी संजीवनी संस्थेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन मिळालं असलं, तरी प्रकल्पाची संकल्पना, त्यामागील मेहनत आणि सातत्य साईश्रद्धाचे स्वतःचे असल्याचं संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स व संस्थांच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. मनाली कोल्हे यांनी सांगितलं.
संजीवनी युनिव्हर्सिटीकडून सर्वतोपरी सहकार्य : आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न राहता आपल्या कल्पकतेचा आणि तंत्रज्ञानाचा समाजाच्या उपयोगासाठी वापर करणं गरजेचं आहे. साईश्रद्धानं आपल्या प्रकल्पातून याच विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली. भविष्यात संशोधन क्षेत्रात पुढे जाण्यासाठी साईश्रद्धाला संजीवनी युनिव्हर्सिटीकडून सर्वतोपरी सहकार्य आणि प्रोत्साहन दिलं जाईल, असंही डॉ. मनाली कोल्हे यांनी स्पष्ट केलं.
साईश्रद्धाने गाठलेली भरारी कौतुकास्पद : लहान वयातच तंत्रज्ञानाचा उपयोग करून हजारो-लाखो प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणारी प्रणाली विकसित करणाऱ्या साईश्रद्धाने आपल्या जिद्दीची आणि कल्पकतेची ताकद दाखवून दिली. आई-वडिलांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे प्रोत्साहन आणि स्वतःची मेहनत यांच्या जोरावर साईश्रद्धाने गाठलेली ही भरारी निश्चितच कौतुकास्पद असून, तिचा प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
हेही वाचा -

