ETV Bharat / state

"...तर निवडणूक आयोगाला विचार करावा लागेल", मतदार यादीतील घोळावरून संजय राऊतांचा टोला

सरकारनं बच्चू कडूंच्या मागण्यांचा विचार करावा आणि शेतकरी कर्जमाफी केली पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut
संजय राऊत (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : October 30, 2025 at 12:21 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान झालं, मतांचा घोटाळा झाला, असा आरोप सर्वपक्षीय विरोधकांनी केला आहे. तसंच, याविरोधात सर्वपक्षीय विरोधक 1 नोव्हेंबर रोजी विराट मोर्चा मुंबईत काढणार आहेत. दरम्यान, या मोर्चाच्या नियोजनासाठी आज (गुरुवारी) सर्वपक्षीय विरोधकांनी बैठक बोलावण्यात आली आहे. याला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते, डाव्या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. तसंच आजच्या बैठकीत मोर्चाबाबत चर्चा होईल. मोर्चानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यात येईल. मात्र, आम्ही दिल्लीला दाखवणार की, तुम्ही जो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत घोटाळा केला आहे, तो या मोर्चातून दाखवून देऊ, असं शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गुरूवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

...तर आयोगाला विचार करावा लागेल : दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी वरळीतील मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण केलं होतं. यानतंर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील मतदान घोळावर सादरीकरण करणार आहेत. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता, ते म्हणाले, "विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी एक विधान केलं होतं की, मतं जातात कुठं? मतं गेली कुठं?... तर मतांचा घोटाळ्याबाबत आमदार आदित्य ठाकरेंकडून बोगस मतदारांचा पर्दाफाश केला गेला आहे. राहुल गांधींनी तर देशातील मत चोरीचा पर्दाफाश केला आहे. आता राज ठाकरे सुद्धा काही वेगळी माहिती देत असतील तर निवडणूक आयोगाला विचार करावा लागेल," असं संजय राऊत यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे : नागपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आंदोलन करत आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "बच्चू कडू हे लढवय्ये नेते आहेत. बच्चू कडूंच्या आंदोलनाना यश मिळाले तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करु. कारण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा ही मूळ संकल्पना शिवसेनेची आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी... त्यांचा साताबारा कोरा करा, या मागणीसाठी आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. आताही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका आहेच. सरकारनं बच्चू कडूंच्या मागण्यांचा विचार करावा आणि शेतकरी कर्जमाफी केली पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुंबई क्रिकेट बोर्डात राजकारणी घुसलेत : दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, "हा क्रिकेटचा विषय आहे. मात्र मुंबई क्रिकेट बोर्डात राजकारणी घुसलेले आहे. कधीकाळी मुंबईचे उत्तमोत्तम क्रिकेटपट्टू आणि क्रिकेट क्षेत्रातील उत्तम प्रशासक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये होते. मात्र गेल्या काही काळामध्ये एमसीए किंवा क्रिकेटच जो बिझनेस किंवा जो व्यापार झाला आहे. त्यामुळं क्रिकेटमध्ये म्हणजे पडद्यामागच्या खेळामध्ये आपण सहभागी व्हावी, असं प्रत्येकाला वाटत आहे. एक मात्र नक्की शरद पवारांनी भारतीय क्रिकेटला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम केलं. यानंतर क्रिकेटकडे सगळ्यांचे डोळे वळले. आयपीएल आणि क्रिकेटकडे सगळे यायला लागले," असं संजय राऊत म्हणाले.

प्रत्येक पक्षाला वाटतंय की, एमसीएमध्ये यावं : याचबरोबर, संजय राऊत यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनवरून भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले, "भाजपाचा आणि क्रिकेटचा फारसा संबंध आला नव्हता. गेल्या चार-पाच वर्षांत ते आलेत. सध्या प्रत्येक पक्षाला वाटतंय की, मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये यावं. आपण मुंबई क्रिकेट बोर्डामध्ये असावं. पण, ते आले तर क्रिकेटचे काय भलं आणि कल्याण होणार, हे माहीत नाही. पण प्रत्येक पक्षाला तिथं जावं, असं वाटत आहे. म्हणजे मुंबई क्रिकेट बोर्ड हे पार्टी बोर्ड आहे, असं प्रत्येक पक्षाला वाटत आहे. आमच्या पक्षाचा एक घ्या... दोन घ्या... असं त्यांना वाटतंय," असं म्हणत संजय राऊत यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील राजकीय घडामोडींवरून निशाणा साधला आहे.

हेही वाचा :

  1. आता रं गड्या ; कौटुंबिक न्यायालयाकडून घटस्फोट मंजूर, उत्साहात पतीनं केलं दुसरं लग्न, मग उच्च न्यायालयानं घटस्फोट केला रद्द
  2. अखेर गूढ उकललं पत्नीनं प्रियकरासह संपवला नकुल भोईर यांचा जीव; हत्येमागील नेमकं कारण काय?
  3. डॉक्टर आत्महत्या प्रकरणात संशयिताचा मोबाईल अखेर पोलिसांच्या ताब्यात; एसआयटीकडं तपास देण्याची मार्डची मागणी