ETV Bharat / state

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊतांचा सार्वजनिक कार्यक्रमांना ब्रेक, पंतप्रधान मोदींनी दिल्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा

खासदार संजय राऊत पुढील काही महिने सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणार आहेत. तब्येतीच्या कारणामुळे त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Sanjay Raut
खासदार संजय राऊत (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : October 31, 2025 at 5:16 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढवणारे शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राऊतांची तब्येत अचानक बिघडल्याचं त्यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. तसंच, काही दिवसांचा ब्रेक घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

नवनाथ बन (ETV Bharat)

नवीन वर्षात भेटू-संजय राऊत : खरं तर, खासदार संजय राऊत हे दररोज सकाळी माध्यमांशी संवाद साधतात. मात्र, आज ते माध्यमांसमोर दिसले नाहीत. यानंतर स्वत: राऊतांनी कार्यकर्त्यांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहिलं. "सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केलं, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचं समोर आलं. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं व गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे की, मी ठणठणीत बरा होऊन साधारणत: नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या".

Sanjay Raut Letter to Party Workers
संजय राऊत यांचे पत्र (ETV Bharat)

1 नोव्हेंबरच्या मोर्चात संजय राऊत नसणार : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. यानंतर या निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप करत विरोधकांनी रान उठवलं आहे. सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मत चोरीवरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा स्थितीत विरोधी पक्षांकडून 1 नोव्हेंबर रोजी विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. पण या मोर्चाला संजय राऊत हे उपस्थित राहू शकणार नाहीत.

'राऊत लवकर बरे व्हावेत' : तर दुसरीकडे राऊत हे लवकर बरे व्हावेत, आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. पत्रकार परिषद घेण्याआधी त्यांनी आपली तब्येत सांभाळावी. संजय राऊत लवकर बरे व्हावेत आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यासाठी पुन्हा मैदानात यावेत, अशी प्रतिक्रिया भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदींचं ट्वीट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील राऊतांच्या चांगल्या आरोग्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, "संजय राऊत जी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो".

सत्याचा मोर्चा, सर्व खऱ्या मतदारांनी सामील व्हा : दुसरीकडे शनिवारी (1 नोव्हेंबर) रोजी सर्व विरोधी पक्षांचा बोगस मतदान आणि मत चोरीविरोधात विराट मोर्चा निघणार आहे. या मोर्चाबाबत शिवसेनेनं (उबाठा) टीझर रिलीज केला आहे.

टीझरमध्ये नेमकं काय? : 37 सेकंदांच्या टीझरमध्ये हा मोर्चा नेमका कशासाठी असणार आहे हे स्पष्ट करण्यात आलं आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या निर्धार मेळाव्यातील वक्तव्याचा संदर्भ असून, ते म्हणत आहेत 'लोकशाहीमध्ये साधारणत: मतदार सरकार निवडतं. आताची परिस्थिती अशी आहे की, सरकार मतदार निवडू लागलं आहे. लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला आम्ही मतदान करू देणार नाही. नाही म्हणजे नाही! मग काय वाटेल ते होऊ देत. निवडणूक आयोगाला मी जाहीर सांगतोय की, या चुका सुधरवा नाहीतर निवडणूक होऊ द्यायची की नाही हे आम्हा सर्वांना मिळून ठरवावं लागेल.'

निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी, बोगस मतदारांचा पर्दाफाश करण्यासाठी, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी, लोकशाही आणि खऱ्या मतदारांचा आवाज बुलंद करण्यासाठी अशी काही वाक्यसुद्धा या टीझर व्हिडिओमध्ये लक्ष वेधून घेत आहेत. या व्हिडिओमध्ये मोर्चाचं ठिकाण आणि वेळही नमूद करत जनतेचं लक्ष वेधण्यात आलं आहे.

हेही वाचा