"प्रयागराजप्रमाणं नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार, हवं तर यादी महाजनांना देतो"-संजय राऊत
शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी आजारपणात विश्रांती घेतल्यानंतर प्रथमच माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी निवडणुकीमधील पैशांचं होणारं कथित वाटप आणि कुंभमेळ्यातील कामावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

Published : December 1, 2025 at 11:48 AM IST
|Updated : December 1, 2025 at 12:19 PM IST
मुंबई - आजारपण असताना अनेक दिवसांनंतर शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. आजारपणात मुख्यमंत्री फडणवीस ते पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी प्रकृतीची चौकशी केल्याची त्यांनी माहिती दिली. शिंदेंचे (शिवसेना) 35 आमदार फुटणार, असा त्यांनी दावा केला.
शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच त्यांच्या तब्येतीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचं माझ्यावर बारीक लक्ष आहे. आताही त्यांची परवानगी नाही. तरी तुम्ही आलात, बऱ्याच दिवसांनी भेटत आहात. आजारापेक्षा उपचार भयंकर असतात. डिसेंबरनंतर मी पूर्णपणे बरा होईन, असा डॉक्टरांनाही विश्वास आहे. रेडिएशन सुरू आहे. माझं आजारपण हे तुरुंगात सुरू झालं. पण, मी थांबणार नाही, लढणार आहे. माझासारखा माणूस स्वस्थ बसणं शक्य नाही. सध्या, मी वैद्यकीय कैदखान्यात आहे. नगरपालिका निवडणुका असताना संपूर्ण राज्यभरात प्रचार केला असता, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
फडणवीस हे जवळचे मित्र होते. त्यांनी सर्व प्रकारच्या मदतीचीही तयारी दाखवली आहे. जवळपास सर्वच मंत्र्यांनी माझ्या प्रकृतीची दूरध्वनी करून विचारपूस केली. पंतप्रधान मोदी हे नियमितपणे चौकशी करतात. आजही त्यांनी चौकशी केल्याचं कळलं-शिवसेना (यूबीटी) खासदार, संजय राऊत
काही ठिकाणी लक्ष्मी दर्शन सुरू- निवडणुकीच्या काळात भाजपाकडून पैसे वाटप होत असल्याचा विरोधकांकडून आरोप होत आहेत. तसंच शिवसेनेचे नेते तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रचार सभेत 1 डिसेंबरला रात्री लक्ष्मी दर्शन होणार असल्याचं विधान केलं होतं. याचा संदर्भ घेत खासदार राऊत म्हणाले, "शिंदे गटाच्या गुलाबो गँगनं 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होणार असल्याचं म्हटलं होतं. निवडणूक आयोगानं त्याची दखल घ्यावी. काही ठिकाणी लक्ष्मी दर्शन सुरू आहे."
शिंदे यांच्याकडील नगरविकास खाते बरखास्त करा- नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीत आतापर्यंत एवढा पैशाचा खेळ कधीच झाला नव्हता. मंत्री आणि मुख्यमंत्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढत नव्हते. स्थानिक पातळीवर निवडणूक लढली जात होती. सध्या राजकीय पक्षांनी पाच-सहा हेलिकॉप्टर घेतली आहेत. एकेका नगरपरिषदेसाठी राजकीय पक्षांचे 25 कोटींचे बजेट आहे. विरोधक निस्तेज नसून अशा पद्धतीनं निवडणुकीत नाहीत. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामधील राज्यातील राजकीय संस्कृती नष्ट झाल्याचा शिवसेनेचे (यूबीटी) नेते राऊत यांनी आरोप केला. ही लोकशाही नाही, किंवा राज्य करण्याची पद्धत नाही. आमच्याकडे नगरविकास खाते असून पैशाची चिंता नसल्याचं सांगितलं जातं. त्यांच्याकडील (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे) खाते बरखास्त केलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली.
भाजपा शिवसेना फोडणार?- गृहमंत्री अमित शाह हे शिवसेना फोडणार असल्याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले, "शिंदे शिवसेनेचा कोथळा हे दिल्लीचे अमित शाह काढणार आहेत. ती त्यांची परंपरा, स्वभाव आणि कार्यपद्धती आहे. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. तिथे शिंदे कोण आहेत? आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला. पण, आम्ही त्यातून बाहेर पडलो. त्यांचे (शिंदे यांचे) 35 आमदार फुटणार आहेत. ज्या पद्धतीनं आमचे फोडले, त्याच पद्धतीनं शिंदे गट फोडण्यात येणार आहे. त्यासाठी डोंबिवलीतील रविंद्र चव्हाण यांची खास नेमणूक करण्यात आली आहे. दिल्लीतील महान नेते आमच्या पाठीशी असतील, असे त्यांना (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे) वाटते. पण, ते कोणाचेही नाहीत. त्यांचा पक्ष (शिवसेना शिंदे) फुटलेला आहे. खरंतर त्यांचा पक्ष हा भाजपानं निर्माण केलेला आहे. त्यांनी (एकनाथ शिंदे) शिवसेनेसाठी कधी आंदोलन केलं? ते कधी तुरुंगात गेले आहेत? असा सवाल करत एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं.
निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करणं अयोग्य- फडणवीस यांना शिंदेंचं राजकारण कळत नाही, तर त्यांनी राजकारणात राहू नये. पैशानं माणसांना विकत घेता येत नाहीत. नारायण राणे हे भाजपाचे खासदार आहेत. भाजपानं आमदार शिवसेनेचे आमदार निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांनी निवडणुकीत पैशांचं वाटप कसं होतं, हे त्यांनी दाखवून दिलं. मी त्यांचं अभिनंदन करतो. निवडणूक आयोगानं त्यांची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं योग्य नाही, असे सांगत राऊतांनी निवडणूक आयोगावर टीका केली. त्याचबरोबर राजकारण हे वाळू सारखं असते. ते मुठीतून कधीही सुटू शकतं, असा त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.
मनसेबरोबर बैठका सुरू- मनसे आणि शिवसेना (यूबीटी) मध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद सुरू आहे. राज ठाकरे यांनी महानगरपालिकेसाठी तयार केलेलं प्रेझेन्टेशन उद्धव ठाकरे यांना दाखविलं. ते उत्तम असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितंलं होतं, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली.
भाजपा हाच मुंबईचा खरा शत्रू - मुंबई हे महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम गौतम अदानी, अमित शाह आणि पंतप्रधान मोदी करतात. भाजपा हाच मुंबईचा खरा शत्रू आहे. काँग्रेसचा बिहारमधील निवडणुकीत विश्वास वाढला असेल तर ते मुंबईत स्वतंत्र लढण्यासाठी तयार असेल तर लढू द्यावे. काँग्रेसनं महाविकास आघाडीत मुंबईत सोबत असणं ही आमची भूमिका आहे. मुंबई ही गौतम अदानींच्या घशात घालण्यात येत असेल तर राज ठाकरे यांची महाविकास आघाडीत गरज आहे.
नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार- प्रयागराजमधील सर्व कंत्राटदार हे गुजरातमध्ये होते. नाशिकमध्येदेखील कुंभमेळ्यासाठी गुजरातमधील कंत्राटदार आहेत. तिथे ठाण मांडून बसले आहे. साधुग्रामसाठी 2 हजार झाडे तोडणार आहेत. रस्ता रुंद करण्यासाठी घरे तोडण्यात येत आहेत. लोकांना बेघर आणि बेरोजगार करत आहेत. हे कुंभमेळ्याचं काम आहे का? 25 हजार कोटींचे बजेट हे संपूर्ण गुजरातमध्ये जात आहे. खोटं वाटत असेल तर गिरीश महाजन यांना विचारा. हवी तर ती यादी गिरीश महाजन यांना देईल.
एसआयआरची चर्चा होणं आवश्यक- संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. त्याबाबत खासदार राऊत यांनी एसआयआर आणि दिल्ली प्रदूषणाबाबत संसदेत चर्चा होणं आवश्यक असल्याचं म्हटलं. प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होण्याची गरज असताना सरकार घाबरते. सरकार चर्चा होऊ देणार नाही, अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली.
हेही वाचा-

