ETV Bharat / state

66 उमेदवार बिनविरोधी कसे निवडून येतात? संजय राऊतांचा थेट सवाल, निवडणूक आयोगावरही केली टीका

महापालिका निवडणुकीत 66 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.

Sanjay Raut
संजय राऊत (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 3, 2026 at 1:35 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मुंबईसह राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी होणार आहे. पण गंमत म्हणजे अजून एकही मत पडायच्या आधीच तब्बल 66 उमेदवार थेट बिनविरोध निवडून आलेत. यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकारावर शिवसेनाचे (उबाठा) खासदार संजय राऊत चांगलेच संतापले आहेत. ही काय निवडणूक आहे? 66 लोक बिनविरोध येतात म्हणजे मतदारांनी करायचं काय? असा थेट सवाल संजय राऊतांनी केलाय.

कोणत्या जोरावर लोक बिनविरोध निवडून आले? : देशाच्या इतिहासात, जगाच्या इतिहासात कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध लोक निवडून आले नाहीत, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. अटलबिहारी वाजपेयी, बॅ. नाथ पै, वसंतदादा पाटील, राममनोहर लोहिया, अगदी नरेंद्र मोदी सुद्धा कधी बिनविरोध निवडून आले नाहीत. मग हे 60–65 लोक कोणत्या जोरावर बिनविरोध येतायत? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

काय म्हणाले संजय राऊत? : महाराष्ट्रात एक नवा ट्रेंड सुरू झाला आहे. बिनविरोध निवडून आणण्याचा. पण हा ट्रेंड लोकांच्या प्रेमामुळं नाही, तर दबाव आणि पैशामुळं आहे. उमेदवारांना जबरदस्तीनं माघार घ्यायला लावलं जातंय. पाच-पाच कोटी, दहा-दहा कोटी रुपये दिले जातात. माघार घ्या म्हणून पैशांचा पाऊस पाडला जात आहे. जळगावात पाच कोटींच्या बॅगा फिरल्याचाही दावा त्यांनी केला. मनसेचे मनोज घरत यांना देण्यात आलेली रक्कम तर ऐकून डोळ्याची बुब्बुळं बाहेर येतील, असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयातून सूचना : "तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ होती. पण तीननंतर कोणी आलं तरी अर्ज घ्या आणि वेळ तीनचीच दाखवा, अशा सूचना थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून दिल्या गेल्या, असा गंभीर आरोप राऊतांनी केला. आरओंचे फोन कॉल तपासा, 24 तासात कोणत्या पालकमंत्र्यांचे फोन आले ते बघा. मग सगळं कसं बिनविरोध झालं ते कळेल, असं आव्हान राऊत यांनी दिलं.

निवडणूक आयोगावर टीका : निवडणूक आयोग भ्रष्टाचाऱ्यांच्या ताटाखालचं पाळीव मांजर झालंय, अशा शब्दांत राऊतांनी निवडणूक आयोगावर टीका केली. कोणी पैसे घेऊन मागे हटले असतील, कोणी दबावाखाली माघार घेतली असेल, तर त्या भागातल्या मतदारांनी काय करायचं? निवडणूक आयोगानं कधी याचा विचार केलाय का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय. एकूणच, मतदानाआधीच निकाल लागतोय, अशी परिस्थिती तयार झाली आहे आणि हे चित्र लोकशाहीसाठी धोक्याचं आहे. मतदारांच्या हक्कांची अशीच पायमल्ली होत राहिली, तर उद्या निवडणूक म्हणजे फक्त औपचारिकता उरेल, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -

  1. राहुल नार्वेकर विसरलेत की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत, संजय राऊतांचा टोला
  2. 'शिवसेना (उबाठा)-मनसे मुंबई महापालिकेत 100 हून अधिक जागांवर विजय मिळवणार'- संजय राऊत
  3. "शिवसेना(उबाठा)-मनसेमध्ये कोणताही तिढा नाही", संजय राऊतांकडून स्पष्टोक्ती; अदानींच्या बारामती दौऱ्यावरूनही मोठा दावा, म्हणाले...