'जे काम उबाठानं केलं, त्याचं श्रेय चोरू नका' : संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या रणधुमाळीत एकमेकांवर आरोप करण्यात राजकीय पक्षांची चढाओढ लागली आहे. त्यातच आता उबाठा खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.


Published : January 11, 2026 at 12:55 PM IST
मुंबई : महापालिका निवडणूक 2026 आता 4 दिवसांवर आलेली असताना सर्वच पक्ष प्रचार सभा आणि त्यातील भाषणांमधून एकमेकांवर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत रस्ते, पाणी आणि कचरा यांसारख्या नागरी सुविधांवर चर्चा व्हायला हवी, असं त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र, भाजपा तिथंही अयोध्या, जय श्री राम आणि बाबरी मशीद असे धार्मिक मुद्दे आणून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
आमची हयात मराठी माणसाचे हक्क टिकवण्यात गेली : "आज मुंबईत आज दिसणाऱ्या उड्डाणपुलात 56 पेक्षा जास्त उड्डाणपूल आणि मोठे प्रकल्प हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून उभे राहिले आहेत. देवेंद्र भाऊ तेव्हा तुम्हीही आमच्या सोबतच होता. जे काम उबाठानं केलं आहे, त्याचं श्रेय चोरू नका. आमची संपूर्ण हयात मुंबईत मराठी माणसाचे हक्क टिकवण्यात गेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तर उभं राहिलंच आहे, पण मराठी माणसाला ताठ मानेनं जगता येणं, हाच खरा विकास आहे," असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी, "तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि जबाबदार नेते आहात. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशा पद्धतीनं खोटं बोलणं तुम्हाला शोभत नाही. जे काम झालं आहे ते झालं आहे, जे नाही झालं ते नाही," असा हल्लाबोलही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
पक्षनिधीसाठी 11 लाख कधीही घेऊन जा : पक्षनिधीचा मुद्दा उपस्थित करत राऊत म्हणाले, पक्षनिधीसाठी हवे असतील, तर हे 11 लाख रुपये तुम्ही कधीही घेऊन जाऊ शकता. पण आधी धार्मिक ध्रुवीकरणाशिवाय निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवा, या शब्दांत त्यांनी भाजपाला थेट चॅलेंज दिलं. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विकासाचा मुद्दा विरुद्ध धर्माचं राजकारण, असा तीव्र संघर्ष सुरु असल्याचे चित्र आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विकासावर बोलण्याचं आव्हान दिलं. या आव्हानाचा समाचार घेताना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना थेट चॅलेंज देत उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेली 1 लाखांची बक्षीस रक्कम आता 11 लाख रुपयांवर नेली आहे.
हिंदू-मुसलमान किंवा भारत-पाकिस्तान : हिंदू-मुसलमान किंवा भारत-पाकिस्तान या विषयांचा आधार न घेता भाजपानं एखादी निवडणूक लढवून दाखवावी, मी त्यांना 1 लाख रुपये देईन, असं आव्हान उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं. यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचे 1 लाख आणि त्यात माझे 10 लाख रुपये मिळवून मी 11 लाख रुपये द्यायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस हे जर स्वतःला शूर आणि महान समजत असतील, तर त्यांनी हे चॅलेंज स्वीकारावं आणि हिंदू-मुस्लीम वादाशिवाय निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हानच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. या संपूर्ण भूमिकेतून संजय राऊत यांनी भाजपावर विकासाच्या मुद्द्यांवरून टीका करत, धार्मिक मुद्द्यांच्या राजकारणाला थेट आव्हान दिलं आहे. मुंबईच्या विकासाचं श्रेय उबाठाचं असून, ते पुसण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा :
- 'मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही, 'बिनविरोध'चंही सोडवलं कोडं, पाहा EXCLUSIVE मुलाखत
- निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट बनलाय, संजय राऊतांचं पुन्हा 'रोखठोक'
- BMC ची सत्ता कोणाच्या हाती जाणार? मुंबईतील विविध भागांमध्ये काय परिस्थिती, कोणाचं पारडं जड? थोडक्यात जाणून घ्या

