संजय राऊत यांना मोठा दिलासा! कथित शौचालय घोटाळा मानहानी प्रकरणात सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
मुंबई सत्र न्याायलयानं खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा दिला आहे.

Published : February 26, 2026 at 1:29 PM IST
By - Amey Rane
मुंबई - शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात कोर्टानं राऊत यांना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केलं आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. कथित शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांनी मेधा सोमय्यांविरोधात मानहानीकारक वक्तव्य केल्याबद्दल माझगाव कोर्टानं संजय राऊत यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. या निकालाला राऊत यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं.
काय आहे शौचालय घोटाळा? - 2022 मध्ये मीरा-भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली होती. त्यातील 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. या कामात बनावट कागदपत्र सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याचा आरोपही याप्रकरणी करण्यात आला होता. त्यानंतर "घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत?, पुरावे कुठे आहेत हेही माहिती आहे. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मेधा सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबानंच केलेला हा घोटाळा" असल्याचं संजय राऊत माध्यमांसमोर जाहीरपणे म्हणाले होते.
माझगाव कोर्टाचा जुना निकाल काय? - रेकॉर्डवरील कागदपत्रं, चित्रफिती पाहता संजय राऊत यांनी 15 आणि 16 एप्रिल 2022 रोजी मेधा सोमय्यांविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचं स्पष्ट होत आहे. त्यांनी केलेलं विधान मोठ्या प्रमाणात लोकांनी ऐकलं आणि वर्तमानपत्रातूनही वाचलेलं आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे याचिकाकर्त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्याचंही त्यांनी पुराव्यातून म्हटलं आहे. त्यामुळे याचिकेतील कलमानुसार आरोपी दोषी असल्याचंही न्यायालयानं याआधी म्हटलं आहे.
संजय राऊतांना माझगाव कोर्टाकडून दिली होती शिक्षा - या खटल्यात खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं 26 सप्टेंबर 2024 रोजी दोषी ठरवलं होतं. ज्यात संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंडही आकारण्यात आला होता. किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी 100 कोटींचा सार्वजनिक शौचालय घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याविरोधात मेधा सोमय्यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.
हेही वाचा -

