सांगलीत पावसाचा हाहाकार; वारणा नदी पात्राबाहेर, तर कृष्णा नदी 24 फुटांवर! शिराळा-वाळवा तालुक्यातील शेती पाण्याखाली
सांगलीतील मुसळधार पावसामुळं वारणा, कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. चांदोली क्षेत्रात अतिवृष्टीमुळे वारणा नदी पात्राबाहेर पडल्यामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

Published : July 8, 2026 at 6:42 PM IST
सांगली : जिल्ह्यात पाऊसाची संततधर सुरूच आहे. त्यामुळं वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं वारणा नदी पात्रा बाहेर पडली आहे. त्यामुळं वारणा नदी काठची शेती पाण्याखाली गेली आहे. तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाचव्या दिवशी अतिवृष्टी कायम आहे. गेल्या 24 तासात 146 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ सुरूच आहे. सांगलीतील आयर्विन पूल भागात कृष्णा नदीची पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे.
शेतात पुराचं पाणी; शेतीचं मोठं नुकसान : वारणा आणि कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात सहा दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळं नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. विशेषतः शिराळा तालुक्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शिराळा आणि वाळवा तालुक्यातील बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
24 तासात 146 मिलीमीटर पावसाची नोंद : शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी कायम आहे. गेल्या 24 तासात धरण पाणलोट क्षेत्रात 146 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळं धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. 34.40 टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात सध्या 17 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 50 टक्के भरलं आहे. दुसऱ्या बाजूला कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. कृष्णा नदीवरील बहे, नागठाणे आणि सांगलीवाडी आणि म्हैसाळ बंधारा पाण्याखाली गेला आहे. मंगळवारी (दि.7) कृष्णा नदीची पाण्याची पातळी आयर्विन पूल इथं 17 फूट होती. यामध्ये वाढ होऊन बुधवारी (दि.8) चार वाजेपर्यंत 24 फुटांपर्यंत पोहोचली होती. मंगळवार दुपारनंतर सांगली जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. शिराळा तालुक्यात देखील पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं वारणा आणि कृष्णाकाठी थोडा दिलासा मिळाला आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा : आठ दिवसांपूर्वी सांगली, मिरज परिसरामध्ये कृष्णा नदीचं पात्र कोरडं पडलं होतं. पाण्याची टंचाई लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडून कृष्णा नदी पात्रातील शेतीसाठी पाणी उपसा बंदी आदेश जारी केला होता. त्यामुळं पिण्याच्या बरोबर शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. मात्र, एक जुलैपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळं कृष्णा नदीचं पात्र दुथडी भरून वाहू लागलं आहे. वारणा आणि कृष्णा नदीतील पाण्याची वाढती पातळी लक्षात घेत प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा :
- मोशीत भीषण दुर्घटना! कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळला; 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
- कोल्हापूर पॅटर्न : देशातील पहिलेच तृतीयपंथीयांचे 'आपत्ती व्यवस्थापन पथक' पूर परिस्थिती हाताळण्यास सज्ज
- नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

