'साई मंदिरात मिळणारं अन्न हे प्रसाद नव्हे जेवण'; सुजय विखेंचं वादग्रस्त वक्तव्य, भाविकांच्या तिखट प्रतिक्रिया
भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी साई मंदिरात मिळणारं अन्न हे प्रसाद नसून जेवण असल्याचा दावा केला. त्यांच्या वक्तव्यावरुन साईभक्तांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Published : December 1, 2025 at 2:02 PM IST
शिर्डी : साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात भाविकांना देण्यात येणारं अन्न हे प्रसाद नसून जेवण असल्याचं खळबळजनक आणि वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी पुन्हा शिर्डीत केलं आहे. सुजय विखे यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी "शिर्डी साईबाबा संस्थानच्या प्रसादालयातील मोफत जेवण बंद करावं," अशी मागणी केली. "अख्खा देश साईबाबांच्या भोजनालयात येऊन फुकट जेवण करतोय. महाराष्ट्रातील सगळे भिकारी इथं गोळा झाले आहेत, हे योग्य नाही. त्यामुळे साईबाबा संस्थाननं भोजनालयातील मोफत जेवण बंद करून सशुल्क करावं," अशी मागणी सुजय विखेंनी केली होती. सुजय विखेंच्या या वक्तव्यानंतर साईभक्तांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात प्रसाद नव्हे मिळते जेवण : माजी खासदार सुजय विखे यांनी आपल्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत आपल्या दाव्याचं समर्थन केलं आहे. त्यांच्या मते प्रसाद हा केवळ घुगरी आणि लापशीपर्यंतच मर्यादित असावा. शिर्डीतील साई प्रसादालयात भाजी, पोळी, वरण आणि भात असं संपूर्ण भोजन दिले जाते. त्यामुळे ते प्रसाद नसून जेवण असल्याचं स्पष्ट मत सुजय विखे यांनी व्यक्त केलं. शिर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित एका कॉर्नर सभेत शिर्डी शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करताना सुजय विखेंनी पुन्हा एकदा साई प्रसादालयातील मोफत भोजनाचा विषय उपस्थित करून हे वक्तव्य केलं.

शिर्डीत साईभक्त म्हणून फिरणारे काही साईभक्त नसून भिकारी : भक्तांनी साईबाबांच्या प्रसादालयात येऊन प्रसाद घ्यावा, याला आमचा विरोध नाही, असं त्यांनी सांगितलं. मात्र काही लोक दारू पिऊन प्रसाद घ्यायला येतात, असं ते म्हणाले. शिर्डीत साईभक्त म्हणून काही लोक फिरत आहेत. पण ते प्रत्यक्षात साईभक्त नसून भिकारी आणि गुन्हेगार आहेत, असा आरोपही सुजय विखे यांनी केला आहे. "हे लोक प्रसादालयात जेवण करून इकडं-तिकडं झोपतात आणि सकाळी पुन्हा आपल्या कामाला लागतात. प्रत्येक देवस्थानी अन्नछत्र चालवलं जाते. त्यात शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्यानं इथं भव्य प्रसादालय साई संस्थाननं उभारलं आहे. त्यात एकावेळी 4 हजार तर दिवसभरात 36 ते 40 हजार भाविक प्रसाद म्हणून भोजन घेतात. मात्र या प्रसादालयात मोफत भोजन मिळत असल्यानं अनेक गुन्हेगार आणि भिकारी इथं फुकटच जेवण करतात. त्यामुळे गुन्हेगारी वाढते. इथं कोणीही येऊन मोफत जेवण करते. ते बंद करून शुल्क जेवण आकारण्यात यावं," अशी मागणी सुजय विखेंनी काही महिन्यांपूर्वी केली होती.

दर्शन घेणाऱ्यांनाच मोफत प्रसाद देण्याचा निर्णय : यावर तोडगा म्हणून साई संस्थाननं साईंबाबांचं दर्शन घेणाऱ्यांनाच मोफत प्रसाद देण्याचा निर्णय घेतला. दर्शन करून बाहेर येताना भाविकांना कूपन देण्यास सुरुवात केली. कूपन असेल तरच मोफत भोजन दिलं जाऊ लागलं. सुजय विखे वारंवार याचा उल्लेख करत आहेत. सुजय विखे यांच्या मते कूपन पद्धत सुरू झाल्यावर दररोज अंदाजे पंधरा हजार लोक कमी झाले आहेत. जे भाविक श्रद्धेनं अन्न ग्रहण करतात, त्यांच्यासाठी तो प्रसाद आहे. पण फुकटे आणि इतरांसाठी ते जेवणच आहे, असं सुजय विखे यांनी म्हटलं. साई संस्थानच्या प्रसादालयातील अन्नदानासाठी मोठी देणगी येते. प्रसादालय दररोज सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत 11 तास सुरू असते. कॉमन हॉलमध्ये भक्तांना मोफत तर ज्यांना थोडी सुविधा असलेल्या जागेत बसून प्रसाद घ्यायचा असतो, त्यांच्याकडून 50 रुपये शुल्क घेतलं जाते. सर्वसाधारण दिवशी दररोज 40 हजार तर उत्सवकाळात 1 लाखाच्या आसपास भाविक इथं येऊन प्रसाद ग्रहण करतात.

आमच्यासाठी प्रसाद म्हणजे साई अमृत : माजी कासदार सुजय विखे यांच्या प्रसाधाबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर साईभक्तांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "आमच्यासाठी साई प्रसादालयात मिळणारा प्रसाद हा साई अमृत आहे. आम्ही हा प्रसाद मोठ्या भक्तीभावानं ग्रहण करतो. त्यामुळे कोणी काय म्हणते, ते आमच्यासाठी महत्वाचं नाही. आमच्यासाठी साई प्रसाद महत्वाचा आहे," असं प्रसादालयात मुंबईतून आलेल्या साई भक्त विनोद शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तर "अतिशय चांगल्या प्रकारचा प्रसाद साई मंदिरात मिळतो. तो आम्ही मोठ्या भक्ती भावानं चाखतो. कोणी त्याला काय म्हणत असेल, ते म्हणू द्या, मात्र आमच्यासाठी तो प्रसादच आहे," असं दिल्ली इथून आलेल्या एका साईभक्त महिलेनं यावेळी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीला सांगितलं. दरम्यान भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत साई मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

हेही वाचा :

