साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्यांना वेसण; संस्थान थेट घरी जाऊन बजावणार नोटीस
साईबाबा यांच्याबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरणाऱ्यांविरोधात साईबाबा संस्थाननं मोठी कारवाई केली आहे.

Published : February 27, 2026 at 8:57 PM IST
|Updated : March 1, 2026 at 7:36 PM IST
अहिल्यानगर : देश-विदेशातील करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांबाबत काही लोकांनी सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली. यासह साईबाबा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केली. त्यांच्याविरोधात साईबाबा संस्थाननं कठोर भूमिका घेतली आहे. साईबाबा यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांना थेट घरी जाऊन साईबाबा संस्थान नोटीस बजावणार आहे. साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी हे आपल्या पथकासह नोटीस देण्यासाठी शुक्रवारी रवाना झालेत.
संबंधितांविरोधात गुन्हा दाखल : मागील काही दिवसांपासून काही व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून साईबाबा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करत असल्याची तक्रार भक्तांनी संस्थानकडं केली होती. यापूर्वी उत्तर भारतातील काही व्यक्तींनी साईबाबा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता. यानंतर साईबाबा संस्थाननं संबंधितांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. यासह राहाता न्यायालयात दावेही दाखल केले आहेत.
15 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल : "या प्रकरणात दिल्लीतील पंडित अजय गौतम यांना राहाता न्यायालयानं हजेरी लावण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांनी न्यायालयात हजर राहून लेखी माफीनामा दिला. तसंच शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेत आरतीला उपस्थिती लावली होती. साईबाबा यांच्याबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्या आणि वादग्रस्त विधान करणाऱ्या 15 व्यक्तींविरोधात संस्थाननं शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केलेत. यासह राहाता न्यायालयात दावेही दाखल केले आहेत," अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
घरी जाऊन बजावणार नोटीस : तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील लोक सोशल मीडियावर साईबाबा यांच्याबाबत चुकीची माहिती पसरवत असल्याच्या तक्रारी संस्थानकडं आल्या होत्या. संस्थाननं याची खातरजमा केल्यानंतर 10 जणांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकांना विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांकडून या लोकांना नोटीस बजावली आहे. साईबाबा मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी स्वतः आपल्या पथकासह संबंधितांच्या घरी जाऊन नोटीस बजावणार आहेत.
याचा साईभक्तांवर कोणताही परिणाम होणार नाही : "सोशल मीडियावर सकारात्मक आशयापेक्षा नकारात्मक आशयाला अधिक प्रसिद्धी मिळते. त्यातून आर्थिक लाभ मिळतो. त्यामुळं काही तरुण प्रसिद्धीसाठी चुकीची माहिती देण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. मात्र सोशल मीडियावर सकारात्मक मार्गानंही आर्थिक उत्पन्न मिळवता येऊ शकते. याचा विचार तरुणांनी करावा. जगभरात साईबाबांचे अनेक भाविक आहेत. साईबाबांची महती वाढत असून शिर्डीत भाविकांची गर्दीही वाढत आहे. काही लोक प्रसिद्धीसाठी साईबाबा यांच्याबाबत चुकीची माहिती पसरवत असले, तरी त्याचा शिर्डी किंवा साईभक्तांवर कोणताही परिणाम होणार नाही. साईबाबा हे अनेक भक्तांचे दैवत असून त्यांच्यावरील श्रद्धा अढळ आहे," असं सोशल मीडिया सल्लागार सुकृत मिराणे यांनी सांगितलं.
हेही वाचा :

