रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार प्रकरण, शूटरसह परराज्यातून अटक आरोपींची पोलीस कोठडी वाढवली
रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात सात आरोपींना मुंबई सत्र न्यायालयानं 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Published : February 26, 2026 at 6:57 AM IST
|Updated : February 26, 2026 at 8:30 AM IST
मुंबई - दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात सात आरोपींना मुंबई सत्र न्यायालयानं 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं विशेष टास्क फोर्सच्या मदतीनं हरियाणा आणि राजस्थान बॉर्डरवरून अटक केली होती. या आरोपींचे संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडलेले असून या आरोपींमध्ये रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणारा शूटर दीपक शर्माचाही समावेश आहे.
कोण आहेत आरोपी? - परराज्यातून अटक केलेल्या आरोपींमध्ये रितिक यादव, सनी आणि सोनू यांना बहाबीजौली, आग्रा येथून, तर मुख्य शूटर दीपक शर्मा याला सेक्टर-45, सादरपूर, नोएडा येथून अटक केली होती. यापैकी दीपक शर्मानं त्याला देण्यात आलेल्या परदेशी बनावटीच्या पिस्तुलानं गोळीबार केला होता, ज्यासाठी त्याला 50 हजार रूपये देण्यात आले. तर सोनू आणि सनीनं रोहित शेट्टीच्या घराची रेकी केली होती. घटनेनंतर हे सर्वजण रातोरात मुंबईतून पसार झाले होते. पुढे रितिक यादवनं या सर्वंना लपण्यासाठी मदत केली. मुंबई पोलिसांनी या सर्वांविरुद्ध बीएनएस कलम 109, एमपीए कलम 37(1), 37(2) तसेच 3, 25 आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.
आरोपींविरोधात संघटित गुन्हेगारीबद्दल मकोका लागू - या प्रकरणी मकोका लावल्यामुळे या आरोपींना जामीन मिळणं कठीण होणार आहे. गुन्हे शाखेकडे आता 30 दिवसांपर्यंत त्यांची कोठडी ठेवण्याचा पर्याय उपलब्ध झालाय. तसेच याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी आता 90 ऐवजी 180 दिवसांची मुदत मुंबई पोलिसांना मिळणार आहे. मकोका अंतर्गत, डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याला दंडाधिकाऱ्यांचे अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे आरोपींनी डीसीपीसमोर दिलेले जबाब हे दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेले अधिकृत जबाब मानले जातील. तसेच खटल्यादरम्यान, आरोपींनी पोलिसांना दिलेले जबाब ते मागे घेऊ शकणार नाहीत. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं पुण्यातून अटक केलेल्या पाच आरोपींना कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावलीय. हत्यार पुरवणारा आरोपी आसाराम फासळे उर्फ बाबू, स्वप्नील बंडू सकट (23), सिद्धार्थ दीपक येनपुरे (20) आणि समर्थ शिवशंकर पोमाजी(18) यांना धायरीतून, तर आदित्य ज्ञानेश्वर गायके (19) याला कर्वे नगरहून अटक केली होती. मुख्य सूत्रधार शुभम लोणकर हा आरोपी अद्यापही फरार आहे.
खंडणीसाठी दहशत माजवण्याचा आरोपींचा मुख्य हेतू - यापूर्वी या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 5 फेब्रुवारी रोजी आरोपी आसाराम फसाळेला पुण्यातून अटक केली होती. पोलीस तपासानुसार, आसाराम फसाळे गेल्या चार वर्षांपासून पुण्यात गॅरेज मेकॅनिक म्हणून काम करत होता आणि लॉरेन्स टोळीशी संबंधित होता. तो टोळीचा मास्टरमाईंड शुभम लोणकरच्या निर्देशानुसार आरोपींना शस्त्रांचा पुरवठा करत होता. आरोपी टोळीच्या निर्देशानुसार चित्रपट कलाकारांना घाबरवण्यासाठी त्यांच्या घरावर गोळीबार करत होते, जेणेकरून त्यांच्याकडून खंडणी वसूल करता येईल.
कशी घडलीय घटना? - मुंबईतील जुहू परिसरात दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या निवासस्थानासमोर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना 28 जानोवारीच्या रात्री उशिरा घडली होती. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. निवासस्थानासमोर गोळीबार झाल्याची माहिती मिळाताच बॉलिवूडसह मुंबईतही एकच खळबळ उडाली. बिष्णेाईचा निकटवर्तीय आरजू बिष्णोईनं आपल्या साथीदारांशी संगनमत करुन गोळीबार केल्याची जबाबदारी घेत सोशल मीडियावर एक ध्वनीफीत प्रसारित केली. या प्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आपला तपास सुरू केला. पोलिसांनी जुहू परिसरातील सीसीटीव्ही तपासलं, ज्यात हल्लेखोर दुचाकीवरुन पसार झाल्याचं आढळून आलं होतं.
हेही वाचा -

