'अजितदादांच्या अपघाताआधी ‘रेकी’?, एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात विमान पाडण्याची मिळाली होती धमकी'- रोहित पवारांचा दावा
आमदार रोहित पवार यांनी चौथी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या विमान अपघातावरून व्हीएसआर कंपनीवर आरोप केलेत. गुन्हेगारी अंगानं तपास करावा, अशी मागणी केली.


Published : March 4, 2026 at 2:04 PM IST
मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी बारामतीसह मुंबईमध्येही अपयश आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यात व्हीएसआर कंपनीकडून झालेला हलगर्जीपणा आदी मुद्द्यांवरून गंभीर आरोप केलेत. यापूर्वीदेखील तीन वेळा पत्रकार परिषद घेतल्यानंतर आज चौथ्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही नवीन, गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत.
"उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूपूर्वी अपघातस्थळाबाबत काही लोकांकडून ‘रेकी’ झाल्याची माहिती पुढे येत आहे. अपघातापूर्वी विमानतळाची पाहणी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातो. आमच्याकडे याबाबत ठोस पुरावे नाहीत. मात्र, या शक्यतेचाही गुन्हेगारी अंगानं सखोल तपास झाला पाहिजे,” अशी मागणी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
पुन्हा व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप- रोहित पवार यांनी व्हीएसआर (VSR) कंपनीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दावोस दौऱ्यादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानप्रवासात नियमांचं उल्लंघन झाल्याचा त्यांनी आरोप केला. त्यांच्या माहितीनुसार, 16 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान शिंदे दावोसला गेले होते. आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी ‘फ्लाइट प्लॅन’ सादर करणं आणि संबंधित देशांची परवानगी घेणं आवश्यक असते.
विमान पाडण्याची इराणकडून देण्यात आली होती धमकी- “परवानगीशिवाय विमान एखाद्या देशात गेले, तर ते पाडलेही जाऊ शकते. शिंदे यांच्या दौऱ्यावेळी अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती,” असा दावा आमदार पवार यांनी केला. याबाबत अधिक सांगताना रोहित पवार यांनी सांगितलं, “विमानात इंधन भरल्यानंतर ते झुरिककडे रवाना झाले. मात्र, उड्डाणादरम्यान हे विमान इराणच्या हद्दीत शिरले. त्यावेळी इराणकडून इशारा देण्यात आला की, “तात्काळ मार्ग बदलला नाही तर विमान पाडण्यात येईल.” त्यावेळी विमानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. इराणकडून आक्षेप घेतल्यानंतर विमानानं इराकच्या दिशेनं मार्ग वळवला. मात्र, इराककडूनही परवानगी नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलं. शेवटी आवश्यक परवानग्या नसल्यामुळे विमान पुन्हा मागे वळवण्यात आलं. सर्व संबंधित देशांकडून उड्डाणाची परवानगी घेतल्यानंतरच ते झुरिककडे रवाना झाले, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला.
कुणीतरी संरक्षण देत असल्याचा संशय - “मला आज एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे. मी व्हीएसआर कंपनीच्या किंवा डीजीसीए (Directorate General of Civil Aviation- DGCA) यांच्या विरोधात नाही. मात्र, अजित पवार यांच्या अपघातातील विमान व्हीएसआर कंपनीचंच होतं. सध्या त्याची चौकशी डीजीसीएकडून सुरू आहे. नेमकं काय घडलं, हे सत्य जनतेसमोर यावं, यासाठीच मी बोलत आहे. या कंपनीला कुणीतरी संरक्षण देत असल्याचा संशय निर्माण होतो आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या दबावामुळे वाचवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो. जर असं काही घडत असेल, तर ‘घात की अपघात’ याचा निष्पक्ष आणि पारदर्शक तपास होणार नाही, ही आमची भीती आहे,” असे रोहित पवार यांनी सांगितलं.
पुरावे नष्ट करण्याचा संशय- एकनाथ शिंदेंच्या बाबतीत घटलेल्या घटनेचा संदर्भ देत रोहित पवार यांनी व्हीएसआर व्हेंचर्स (VSR Ventures) कंपनीवर हलगर्जीपणाचा आरोप केला. “या कंपनीवर विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकते,” असे ते म्हणाले. कोविड काळात खासगी विमानाची तिकीटे विकताना रुग्णांकडून जादा पैसे आकारल्यामुळे कंपनीवर यूएईमध्ये सहा महिन्यांची बंदी घालण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
विमान अमेरिकेत हलविले- या प्रकरणात कागदपत्रांमध्ये फेरफार होण्याची शक्यता व्यक्त करत रोहित पवार यांनी तातडीनं चौकशीची मागणी केली. अपघातानंतर संबंधित विमाने महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर हलवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. हैदराबादमध्ये असलेले ‘लेगसी 600’ विमान सॅन मारिनो (यूएसए) येथे हलवण्यात आल्याचं ते म्हणाले. “जर काहीच चुकीचे नसेल, तर घाबरण्याचे कारण काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, या सर्व आरोपांमुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीभोवतीचे प्रश्न अधिकच संशयास्पद झाले आहेत. सखोल आणि निष्पक्ष तपासाची मागणी जोर धरू लागली आहे.
हेही वाचा-
- "ते" चार नेते दादांना त्रास देत होते; रोहित पवार यांचा कुणावर निशाणा? सुनेत्रा पवार यांना बोलू दिलं जात नसल्याचा थेट आरोप
- अजित पवार विमान अपघात प्रकरणी गुन्हे दाखल करा, बारामती पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक
- मरिन ड्राईव्हनंतर बारामती पोलिसांकडूनही एफआयआर नाही; रोहित पवार म्हणाले,'पोलिसांचे चेहरे पाहूनही दबाव जाणवतो'

