हे ऑपरेशन टायगर नाही, तर 'बाजार ऑपरेशन'; सचिन अहिरांच्या उमेदवारीवर रोहित पवारांचा टोला
रोहित पवारांनी सचिन अहिरांच्या उमेदवारीवर टीका करत 'ऑपरेशन टायगर'ऐवजी 'बाजार ऑपरेशन' म्हटलं आहे. तसंच ऑनलाइन MPSC परीक्षा रद्द करण्याची मागणी केली.

Published : June 30, 2026 at 3:47 PM IST
पुणे : राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 'ऑपरेशन टायगर-3'ची चर्चा सुरू असतानाच विधानसभेच्या उपसभापतीपदासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आमदार सचिन अहिर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराला महायुतीकडून उमेदवारी देण्यात आल्यानं 'ऑपरेशन टायगर-3'ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "सचिन अहिर यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. ते आधी आमच्या पक्षात होते, नंतर ठाकरेंच्या पक्षात गेले आणि आता शिंदे पक्षात गेले आहेत. आपण जसे कपडे बदलतो तसे विचार आणि पक्ष बदलले जात असतील, तर जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा? हे 'ऑपरेशन टायगर' नसून 'बाजार ऑपरेशन' आहे."
आमदार-खासदार फोडण्यासाठी पैशांची उधळपट्टी : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा पद्धतीला विरोध करत असून परीक्षा ऑफलाइन घेण्याची मागणी करत आहेत. यासंदर्भात रोहित पवार यांनी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "एका बाजूला गरीब स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपयांचा परीक्षा फॉर्म भरणेही कठीण जाते, तर दुसऱ्या बाजूला आमदार-खासदार फोडण्यासाठी 100-100 कोटी रुपयांची उधळपट्टी केली जाते. हा गरिबांवर अन्याय असून पैशांच्या या राजकारणामुळं भविष्यात लोकांचा लोकशाही आणि मतदान प्रक्रियेवरील विश्वास उडू शकतो.", असं रोहित पवार म्हणाले.
ऑनलाइन परीक्षेचा निर्णय तातडीनं रद्द करावा : पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात यापूर्वी झालेल्या ऑनलाइन परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे आणि पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांचा संगणकाधारित परीक्षा पद्धतीवरील विश्वास उडाला आहे. शासनाच्या निर्णयात अनेक गंभीर त्रुटी असून हा निर्णय विद्यार्थी आणि आम्हाला मान्य नाही. "महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आगामी पूर्व परीक्षा संगणकाधारित (ऑनलाइन) पद्धतीने घेण्याचा निर्णय तातडीनं रद्द करावा. यासाठी आज आणि उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या समितीसह आम्ही त्यांची भेट घेऊ. हा निर्णय मागे घेतला नाही, तर राज्यभर विद्यार्थ्यांसह तीव्र आंदोलन केलं जाईल," असा इशाराही त्यांनी दिला.
मी स्वतः कधीही भाजपासोबत जाणार नाही : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात दोन गट पडल्याच्या तसंच काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चेबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले, "आमच्या पक्षात अशा कोणत्याही चर्चा सुरू नाहीत. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष पूर्णपणे एकसंध आणि भक्कम आहे. मी स्वतः कधीही भाजपासोबत किंवा त्यांच्या विचारसरणीसोबत जाणार नाही." भाजपावर टीका करताना ते म्हणाले, "भाजपा डिलिमिटेशनच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांचे आमदार-खासदार फोडण्याचे काम करत आहे. तसंच शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. भाजपा दिलेला शब्द पाळत नाही." तर अजित पवार यांच्या विमान अपघाताला पाच महिने पूर्ण झाल्याबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, "या प्रकरणातील काही पुरावे घेऊन आम्ही लवकरच पत्रकार परिषद घेणार आहोत."
हेही वाचा -
- उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची नजर आता आमदारांवर? राजकीय वर्तुळात 'ऑपरेशन टायगर 3' ची चर्चा
- २०२९ ला सर्व खासदार शिवसेनेच्या तिकिटावरच लढणार, एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती; दादरमध्ये शिवसेना भवन बांधण्याचा निर्धार
- मोठी बातमी! ऑपरेशन टायगर यशस्वी, उद्धव ठाकरे यांच्या सहा फुटीर खासदारांचा शिवसेनेत प्रवेश

