अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाडांकडून मोठा संशय व्यक्त
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावर गाजणार आहे. या मुद्द्यावरूनच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर शंका व्यक्त केल्यात.


Published : February 23, 2026 at 2:03 PM IST
|Updated : February 23, 2026 at 4:48 PM IST
मुंबई : आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं असून, आज हा अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विशेषतः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या विमान अपघाताच्या मुद्द्यावर गाजणार आहे. या मुद्द्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर शंका व्यक्त केल्यात. रोहित पवार यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, अजित पवार आज नाहीत. त्यामुळे अधिवेशनात काय बोलावं ते कळत नाही. एवढा मोठा नेता आपल्यात नाहीये. ही वेदना आहे. अजितदादांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडलाय. त्यांनी नेहमी काम करत राहा, असा विचार आपल्या सगळ्यांना दिलाय.
अजितदादांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी- रोहित पवार : त्यांनी अधिवेशनाबाहेर शोक प्रस्तावाबाबत सांगितले की, दिवंगत अजित पवार यांच्याविषयी शोक प्रस्ताव सभागृहात मांडला जाणार आहे, परंतु त्याआधी त्यांनी विमान अपघाताच्या चौकशीसंबंधी सगळे पुरावे तपास यंत्रणा योग्य पद्धतीने गोळा करत आहेत का? हे तपासावे. अजितदादांच्या अपघाताची सखोल चौकशी ही झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. रोहित पवार यांनी पुढे म्हटले, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मी पत्र देणार आहे. नायडू यांना पदावर ठेवणं योग्य नाही. रिपोर्टमध्ये डिटेल्स असावेत, थातूरमातूर उत्तर नसावं, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

त्या विमानाला भारतात उडण्याची परवानगी नव्हती- आव्हाड : जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी सांगितले, ब्लॅक बॉक्स जळून गेला ही माझी सर्वात मोठी शंका आहे. त्या विमानाला भारतात उडण्याची परवानगी नव्हती. त्या विमानाने 5000 तासांपेक्षा जास्त उडू नये, असे असतानाही ते विमान 8 हजारांपेक्षा जास्त तास उडून झाले होते. यात एका माणसाचा जीव गेला. महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याचा जीव गेला. आव्हाड म्हणाले की, माणसाचा स्थायी स्वभाव संशयी असतो. ब्लॅक बॉक्स जिथे असतो, तो विमानाचा भाग जशाच्या तसा तिथे होता. रोहित पवार काही चौकशी करीत आहेत, ते अतिशय योग्य आहे. ते बरंच संशोधन करतात आणि त्या माध्यमातून विमानाची बरीच माहिती काढली आहे.
डीजीसीए अधिकारी कोणाच्या दबावाखाली : ते पुढे म्हणाले, कंपनी कोणाची, कंपनीत पैसे कोणाचे लावलेत, विमान किती तास उडलं होतं, त्याला इतके तास उडण्याची परवानगी होती का नव्हती, डीजीसीए काही कव्हर करायला बघतंय का? डीजीसीए अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत, ही कंपनी कोणाच्या अधिपत्याखाली चालते, हे सर्व प्रश्न आता समोर आलेत. जेवढी चौकशी लांबवतील, जेवढ्या खोट्या नाट्या गोष्टी सांगतील की ब्लॅक बॉक्स जळून गेला, तेवढा संशयाला वाव मिळेल.
ब्लॅक बॉक्स जळला, असा दावा संशयास्पद- आव्हाड : आव्हाड म्हणाले, मला या अपघाताबद्दल सर्वात आश्चर्य वाटतंय ते म्हणजे ब्लॅक बॉक्स जळून गेला. ब्लॅक बॉक्स ज्या गोष्टीपासून बनवलेले आहे, ते मटेरिअल टायटेनिअम आहे, म्हणजे 11 हजार सेल्सिअसच्या आगीतही काहीही होऊ शकत नाही. त्यामुळे ब्लॅक बॉक्स जळला, असा दावा संशयास्पद आहे. सध्या अजित पवारांच्या विमान अपघाताची गंभीर चौकशी सुरू आहे आणि रोहित पवार तसेच जितेंद्र आव्हाड यांनी या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सखोल चौकशी आणि सत्य शोधण्याची मागणी केलीय. ब्लॅक बॉक्स जळल्याच्या शंकेमुळे आणि विमानाला दिलेल्या उड्डाण परवानग्यांविषयी प्रश्न उपस्थित केल्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचाः
मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान; 9 मार्चला होणार सुनावणी
शरद पवार यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती, कधी मिळणार डिस्चार्ज?

