साताऱ्यात 23 तोळे दागिन्यांची लूट करून दरोडेखोरांचे पलायन, शिरपूरमध्ये सिनेस्टाईल पाठलाग करत संशयितांना घेतलं ताब्यात
या गुन्ह्याच्या कटात कुरिअर कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचाच सहभाग असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

Published : February 28, 2026 at 3:38 PM IST
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुरिअर कर्मचाऱ्याला मारहाण करून 23 तोळे सोन्याचे दागिने लुटून पलायन केलेल्या दरोडेखोरांना अवघ्या 12 तासात धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथं जेरबंद करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आलं आहे. शुक्रवारी रात्री साडे बाराच्या सुमारास ही लूटमार झाली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दरोडेखोरांचा पाठलाग करत महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर पोलिसांनी दरोडेखोरांना ताब्यात घेतलं. अभिषेक शिकलगार, अंकुश जाट, अनुज दिवाकर, पंकज राठोड व अजय राठोड, अशी संशयितांची नावं असून ते मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचे आहेत. या गुन्ह्याच्या कटात कुरिअर कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचाच सहभाग असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
दागिने लुटून कारमधून पलायन : सातारा शहर पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती देताना सांगितलं की, साताऱ्यातील लक्ष्मी कुरिअर कंपनीचा कर्मचारी 23 तोळ्याचे दागिने घेऊन कोल्हापूरहून येणाऱ्या ट्रॅव्हल्समधून पुण्याला जाणार होता. तो सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला असताना स्विफ्ट कारमधून आलेल्या पाच जणांनी त्याला जबर मारहाण करत त्याच्याकडील दागिने लुटून कारमधून पलायन केलं. दरम्यान, कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यानं घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना दिली. यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी दाखल होत तपासाची चक्रे वेगानं फिरवली. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतली. तसंच मोबाईल लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण करत दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला.

पाचही दरोडेखोरांना घेतलं ताब्यात : संशयित आरोपी अहिल्यानगर मार्गे धुळ्याकडे निघाले होते. त्यामुळं सातारा पोलिसांनी शिरपूर पोलिसांना अलर्ट केलं. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील शिरपूर इथं सापळा रचून सातारा आणि शिरपूर पोलिसांनी पाचही दरोडेखोरांना ताब्यात घेतलं. दरोडेखोरांनी लुटलेले 23 तोळे सोनं तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार ताब्यात घेतली आहे. सध्या संशयितांना घेऊन सातारा शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक साताऱ्याला येत असल्याचं सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक सुधीर मोरे यांनी सांगितलं. दरम्यान, धाडसी दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून दरोडेखोरांना जेरबंद केल्याबद्दल सातारा शहर पोलिसांचं कौतुक होत आहे.
हेही वाचा :

