आषाढी वारीनिमित्त देखण्या रथांना वाढती मागणी, कोल्हारमधील तरुण उद्योजकाचा 25 वर्षांचा यशस्वी वारसा
वडिलांच्या अनुभवाला आधुनिकतेची आणि नव्या डिझाईन्सची जोड देत हर्ष यांनी रथ तयार करण्याच्या व्यवसायाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

Published : June 23, 2026 at 1:28 PM IST
|Updated : June 23, 2026 at 8:41 PM IST
शिर्डी - आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून संपूर्ण महाराष्ट्रात विठू माऊलीच्या गजरात दिंड्या आणि पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. वारकरी संप्रदायाचा हा सर्वात मोठा सोहळा रथांशिवाय अपूर्ण आहे. याच पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणारे आकर्षक आणि देखणे रथ तयार करण्यात राहाता तालुक्यातील कोल्हारमधील मस्के कुटुंबीय आघाडीवर आहे. गेल्या 25 वर्षांपासून रथ निर्मितीचा हा पारंपरिक व्यवसाय मस्के कुटुंबीयांनी अखंडपणे सुरू ठेवला असून सध्या या व्यवसायाची धुरा तरुण उद्योजक हर्ष प्रभाकर मस्के हे अत्यंत यशस्वीपणे सांभाळत आहेत.
प्रभाकर मस्के कुटुंबाचा हा रथ बनवण्याचा व्यवसाय गेल्या अडीच दशकांपासून राहाता तालुक्यातील कोल्हारमध्ये अविरतपणे चालत आला आहे. सुरुवातीला हर्ष मस्के यांचे वडील प्रभाकर मस्के या व्यवसायाचे संपूर्ण नियोजन आणि काम पाहत असत. मात्र बदलत्या काळाची गरज ओळखून गेल्या 5 ते 6 वर्षांपूर्वी हर्ष यांनी हा कौटुंबिक व्यवसाय आपल्या हाती घेतला आहे. वडिलांच्या अनुभवाला आधुनिकतेची आणि नव्या डिझाईन्सची जोड देत हर्ष यांनी या व्यवसायाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्यांनी तयार केलेले रथ केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा विषय ठरत आहेत.
हर्ष मस्के यांनी बनवलेल्या रथांना संपूर्ण महाराष्ट्रातून मोठी मागणी असते. त्यांचे रथ मराठवाड्यापासून ते थेट पश्चिम महाराष्ट्रापर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये दिंड्यांची शोभा वाढवत आहेत. यामध्ये प्रामुख्याने परभणी, बीड, गेवराई, आष्टी, सातारा यांसारख्या अनेक भागांचा समावेश आहे. या प्रत्येक जिल्ह्यात मस्के यांनी तयार केलेले किमान दोन ते तीन रथ आज घडीला कार्यरत आहेत. हे भव्य आणि सुबक रथ प्रामुख्याने विविध देवस्थान समित्या, धार्मिक संस्था किंवा गावांमधील नागरिक एकत्र येऊन, लोकवर्गणी करून बनवून घेतात. ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थितीचा विचार करून मस्के भाविकांना अत्यंत वाजवी दरात रथ उपलब्ध करून देतात. एका रथाची किंमत साधारणपणे पावणेतीन लाख रुपयांपर्यंत असते. हा रथ बनवताना सर्व खर्च वजा जाता त्यांना साधारण 10 ते 20 टक्के नफा मिळतो. कमी खर्चात दर्जेदार आणि मजबूत साहित्य वापरणे हे त्यांच्या व्यवसायाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

आषाढी एकादशीच्या वारीसाठी रथांची मागणी खूप आधीपासून असते. रथ तयार करण्यासाठी अत्यंत सुबक कोरीव काम आणि वेळेचे अचूक नियोजन गरजेचे असते. यासाठी मस्के यांचे नियोजन दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच सुरू होते. जानेवारीत ऑर्डर्स निश्चित झाल्यानंतर पुढील 6 ते 7 महिन्यांच्या अवधीत रथांचे काम पूर्ण केले जाते आणि आषाढी वारीपूर्वी ते रथ संबंधित गावांना किंवा संस्थांना सुपूर्द केले जातात.


हेही वाचा...

