ETV Bharat / state

'विलासराव देशमुख यांच्याबद्दलच्या विधानासाठी माफी मागतो'; टीका होताच रवींद्र चव्हाण यांचं घूमजाव

विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.

Ravindra Chavan
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 6, 2026 at 3:51 PM IST

|

Updated : January 6, 2026 at 4:46 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

छत्रपती संभाजीनगर - दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. त्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. या विधानावरुन चव्हाण यांनी घुमजाव करत देशमुख कुटुंबीयांची दिलगिरी व्यक्त केली. काँग्रेसनं देखील भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय.

वादग्रस्त विधानावर रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

रवींद्र चव्हाण यांचं घुमजाव - "मी दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर जराही टीका-टिप्पणी केली नाही. विलासराव देशमुख मोठे नेते होते. त्यामुळं त्यांना फोकस करून काँग्रेस तिथं मत मागत आहे. त्या संदर्भात मी विधान केलं होतं. तरी त्यांचे चिरंजीव व कुटुंब यांचं मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो," असं म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माफी मागितली. तसंच त्यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केला.

दिलगिरी व्यक्त केली - "निवडणुका या कशासाठी असतात तर त्या नागरी सुविधा कोणता पक्ष गतिमान देईल यासाठी असतात. सर्व नागरी सुविधा लातुरात व्हायला हव्यात," असं म्हणत रवींद्र चव्हाण यांनी अधिक बोलणं टाळलं. तर त्यांनी विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली.

देशमुख कुटुंबीयांनी केली टीका - भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर देशमुख कुटुंबीयांनी कडाडून टीका केली. दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, "लोकांसाठी जगणाऱ्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही." अशा भाषेत त्यांनी टीका केली. तर आमदार अमित देशमुख यांनी देखील टीका करत "राजकारण कुठल्या थराला चाललंय हा प्रश्न पडलाय. दुर्दैवी आहे की, त्यांनी असं विधान करायला नको होतं. लातूर किंवा महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. सर्व स्तरातून निषेध होतोय," असं म्हटलंय.

सपकाळ यांनी देखील केली टीका - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर लगेच टीका करून उत्तर दिलं. "दिवंगत विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण झाला नाही. अनेकजण इच्छा बाळगून आलेत. मात्र, स्वाभिमानी लातूरकरांना त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केलं. सत्तेचा माज असलेले भाजपा नेते लातूर येथे येऊन बरळून जातात की, साहेबांच्या आठवणी पुसल्या गेल्या. विलासराव देशमुख यांचं लातूरशी असलेलं नातं भाजपाला कधीच कळणार नाही. लातूरच्या कर्तृत्व संपन्न सुपुत्राचा अवमान लातूरकर कधीच सहन करणार नाही, भाजपावाल्यांनो याद राखा, करारा जवाब मिलेगा," अशी टीका सपकाळ यांनी भाजपावर केली.

विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसणं शक्य नाही : नाना पटोले - या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनीही निषेध व्यक्त केला. "विलासराव देशमुख यांच्या आठवणी केवळ लातूरमधूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून पुसल्या जाऊ शकत नाहीत. विलासराव देशमुख यांच्यासारखं दिलखुलास व्यक्तिमत्व राज्याच्या राजकारणात होतं, ही महाराष्ट्राला अभिमान वाटावा, अशी गोष्ट आहे. त्यांच्याबद्दल बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेलं विधान हे अत्यंत दुर्दैवी आणि त्यांची मानसिकता दाखवणारं आहे. रवींद्र चव्हाणच काय कुणालाही विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसणं शक्य नाही. आपल्या संस्कृतीत दिवंगत व्यक्तींच्या स्मृती जपल्या जातात. मात्र संस्कृतीच माहिती नसणाऱ्या लोकांची विकृत मानसिकता हे समजू शकत नाही. विलासराव देशमुख यांच्याबद्दल रवींद्र चव्हाण जे बोलले ते हा महाराष्ट्र कदापि विसरणार नाही आणि येणाऱ्या काळात त्यांना मतपेटीतून चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही," असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

हेही वाचा -

  1. 'नमो ठाणे' शेजारी लागलं 'जगणं झालं सोपं' असं शिवसेनेचं पोस्टर, महापालिका निवडणूक प्रचार शिगेला
  2. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट बनलाय, संजय राऊतांचं पुन्हा 'रोखठोक'
  3. पोलीस 15 मिनिटे बाजूला काढा, मग मसल पॉवर काय आहे ते दाखवू; संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज
Last Updated : January 6, 2026 at 4:46 PM IST