ETV Bharat / state

'जेन झींकडं दुर्लक्ष करुन चालणार नाही'; रामदास आठवलेंची अभिजीत दिपकेंना पक्षात येण्याची ऑफर

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिजीत दिपके यांना 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'मध्ये येण्याची ऑफर दिल्याची माहिती दिली.

Ramdas Athawale
शिर्डी येथील पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 25, 2026 at 10:32 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिजीत दिपके यांना 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'मध्ये येण्याची ऑफर दिल्याची माहिती दिली. अभिजीत दिपके यांचे वडील इंजिनिअर असून, रिपब्लिकन पक्षाच्या पँथर्सच्या चळवळीला त्यांचे मोठे सहकार्य मिळाले असल्याचे आठवले म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिर्डीत पत्रकार परिषद घेतली. अभिजीत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे असून, जय भीमचा नारा देणारे तरुण आहेत. त्यामुळे त्यांच्यासारखा तरुण सोबत आल्यास तरुण पिढी अधिक सक्रिय होऊ शकते, असे आपण त्यांना सांगितल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. तुला हवामानाचा चांगला अंदाज आहे. मलाही तुझा अंदाज आहे. त्यामुळे तू आमच्यासोबत ये, असे आपण अभिजीत दिपके यांना सांगितले होते. मात्र, मी माझी पार्टी चालवणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्यावर आपण ठीक आहे असे म्हटल्याचे आठवले यांनी सांगितले.

अभिजीत दिपके यांनी लातूरसह इतर ठिकाणी जाऊन पाहिलेल्या शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दाही रामदास आठवले यांनी उपस्थित केला. अशा शाळांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असून, भारत सरकार आणि राज्य सरकारने या शाळांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे आठवले यांनी सांगितले.

'जेन झी'बद्दल बोलताना आठवले म्हणाले की, माझा आणि जेन झीचा संबंध रोजचा आहे. रोज मला जेन झीचे लोक येऊन भेटतात. त्यांच्याशी माझा संवाद नेहमीच असतो. आपण सांगितल्याप्रमाणे मुलांसाठी संवाद ठेवण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. आता राहुल गांधींचा संवाद झालेला आहे. देवेंद्र फडणवीस यांचाही झालेला आहे. आता माझाच बाकी आहे. मी प्रयत्न करेन आणि आयोजन करून आपण मुलांशी बोलू, तरुण मुलांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत, जो उद्रेक आहे तो जाणून घेऊन त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल यावर भर दिला पाहिजे.

आमच्या सरकारचीही हीच भूमिका आहे की, नरेंद्र मोदी यांनी जो अजेंडा बनवलेला आहे, त्यामध्ये युवा, किसान, शेतकरी, महिला आणि गरीब या वर्गाला न्याय देणे व त्यांच्या भावना समजून घेणे हा मुख्य अजेंडा आहे. युवकांच्या सोशल मीडियाच्या प्रचारामुळे आणि ते आमच्या पाठीशी उभे राहिल्यामुळेच आम्हाला 2014 आणि 2019 मध्ये सत्ता मिळालेली आहे. त्यामुळे जेन झीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत, असे आठवले म्हणाले.

हेही वाचा -

  1. 'ही आमची शाळा नाही!' लातूरमध्ये विद्यार्थ्यांची कॅमेऱ्यासमोर कबुली; अभिजीत दिपकेंनी उघड केला प्रकार
  2. 'गावागावामध्ये जंतरमंतरसारखे आंदोलन होईल,शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा'- अभिजीत दिपके
  3. 'देशातील तरुण जागरूक झाल्यानं मी समाधानानं निवृत्त होऊ शकतो'-दिपकेंच्या भेटीनंतर तुषार गांधींची भावना