शाहरुख खानची भूमिका देशविरोधी, बांगलादेशच्या मुस्तफिजूर रहमानला केकेआरमध्ये घेतल्यानं स्वामी रामभद्राचार्य संतापले
जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य अभिनेता शाहरुख खान याच्यावर संतापले आहेत. शाहरुखचा आयपीएल संघ केकेआरनं बांगलादेशी खेळाडूला आपल्या संघात घेतल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे.

Published : January 2, 2026 at 5:45 PM IST
नागपूर : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याच्या मालकीच्या आयपीएल संघ कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) ने आगामी आयपीएलसाठी बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला आपल्या संघात घेतल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. अध्यात्मिक जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला असून ते म्हणाले, 'शाहरुख खान हिरो नाही, त्याला कोणतंही चरित्र नाही. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय दुर्भाग्यपूर्ण आहे', असं रामभद्राचार्य यांनी सांगितलं. ते नागपुरात बोलत होते.
खरं तर, कोलकाता नाइट रायडर्सनं आयपीएल 2026 साठीच्या मिनी लिलावात बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला 9.20 कोटी रुपयांना खरेदी केलं. बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय वादग्रस्त ठरला असून, भारतात यावर तीव्र रोष व्यक्त होत आहे.
रामभद्राचार्य काय म्हणाले? : अलीकडेच बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत. गेल्या 12 दिवसांत 3 हिंदूंच्या हत्या झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशा स्थितीत, स्वामी रामभद्राचार्य यांनी संताप व्यक्त करत म्हटलं की, 'बांगलादेशमध्ये हिंदूंचा ज्या प्रकारे छळ केला जातो आहे, ते अतिशय दुर्दैवी आहे. बांगलादेशातील लोकांच्या आणि सरकारच्या हे लक्षात आणून दिलंच पाहिजे की, बांगलादेश हा हिंदूंच्या पाठिंब्यानं निर्माण झालेला देश झाला आहे'.
'शाहरुख खानची भूमिका देश विरोधी' : शाहरुखचं व्यक्तिमत्व नेहमीच पाकिस्तान व बांगलादेशसाठी उभं राहिलेलं आहे, याचाच अर्थ शाहरुख खान देशाविरुद्ध काम करत आहे का? असा सवाल उपस्थित करत शाहरुखची भूमिका सातत्यानं देशविरोधीच राहिली असल्याचं देखील स्वामींनी म्हटलं.
बांगलादेशी खेळाडूंना बॅन करा- प्यारे खान : ज्या प्रकारे भारतानं पाकिस्तानी खेळाडूंना बॅन केलं आहे. त्याच प्रमाणे बांगलादेशी खेळाडूंनाही भारतानं आयपीएलमधून बॅन करावं, अशी मागणी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केली आहे. त्यामुळे हळूहळू बांगलादेश पाकिस्तान प्रमाणेच जगात एक्सपोज होईल. या संदर्भात मी स्वतः शाहरुख खान, भारत सरकार आणि आयपीएल कमिटीला एक पत्र लिहून मागणी करणार आहे असंही प्यारे खान यांनी सांगितलं.
देश प्रथम, नंतर सर्व- प्यारे खान : शाहरुख खान देशाचा प्रमुख अभिनेता आहे. मोठा व्यावसायिक आहे. तो स्वतः अल्पसंख्यांक आहे. त्यामुळे त्यानं दुसऱ्यांच्या भावनांचा सुद्धा आदर करावा, असा सल्लादेखील प्यारे खान यांनी दिला. ज्या देशात अल्पसंख्यांक लोकांवर अत्याचार होतात, तो देश कधीच प्रगती करू शकत नाही. ज्या प्रकारे भारतात अल्पसंख्यांक लोकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते, त्याच प्रमाणं तिथल्या (बांगलादेश) हिंदू अल्पसंख्यांक लोकांची काळजी घेतली जावी, अशी मागणी प्यारे खान यांनी केली. सोबतच, देश सर्वप्रथम हा नियम सर्वांनी लागू केला पाहिजे, त्यासाठी एक पत्रदेखील शाहरुख खानला लिहिणार असल्याचं प्यारे खान यांनी सांगितलं.
भारतीय हिंदूंवर अन्यायकारक - कृपाल तुमाने : बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार होत आहेत. यामुळे भारतामध्ये त्यांच्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी देऊच नये, शाहरुख खानचा हा निर्णय आपल्या देशातील हिंदूंवर अन्याय करत आहे, असं शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने म्हणाले.
हेही वाचा

