ETV Bharat / state

'कबुतरांमुळे आईचा मृत्यू झाला, हा मुद्दा विधिमंडळात मांडला नसता तर तिला आवडलं नसतं'-राम कदम

कबुतरांमुळे आईचा मृत्यू झाल्याचं सांगत भाजपा आमदार राम कदम यांनी कबुतरखाने नॅशनल पार्कमध्ये हलविण्याची सभागृहात मागणी केली. यावर ईटीव्हीशी बोलताना त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

Ram Kadam
आमदार राम कदम (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 8, 2026 at 7:39 AM IST

|

Updated : July 8, 2026 at 8:47 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून मुंबईमध्ये कबुतरांमुळे मराठी विरुद्ध जैन समाज समोरासमोर आल्याचं दिसून आलं होतं. दादरमधील कबूतर खाना बंद केल्यानंतर हा वाद उफाळून आला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपा आमदार राम कदम यांनी कबुतरांमुळे होणाऱ्या रोगाचा प्रश्न उपस्थित केला.

पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपा आमदार राम कदम म्हणाले," माझ्या आईला कबुतरांमुळे इंटरस्टिशियल लंग डिसीज हा गंभीर आजार झाला. त्यानंतर तिचं निधन झालं".

राम कदम यांनी काय सांगितलं? (Source- ETV Bharat Reporter)
याविषयी ईटीव्ही भारतशी सविस्तर बोलताना राम कदम म्हणाले की, "जे माझ्या आईसोबत घडलं, ते कोणासोबतही घडू नये. माझी आई देवाधर्माचे कार्य करायची. मात्र, तिला जाताना खूप वेदना झाल्या. अशा वेदना कोणालाही इतरांना होऊ नये, हीच माझी भावना आहे. माझ्या मते कबुतरांनादेखील जगण्याचा अधिकार आहे. अशावेळी त्यांची जर जागा बदलली तर नक्कीच त्या कबुतरांचा त्रास माणसाला होणार नाही. कबूतरही जगू शकतील".


"कबुतरांमुळे सर्वसामान्य त्रास होतो की नाही? हे आपण न ठरवता, हे डॉक्टरांनी ठरवायला हवं. माझा कबूतर खाना किंवा कबुतरांना विरोध नाही. मात्र, त्या जागेवरून त्यांना हटवून मुंबईतील इतर ठिकाणी जर स्थलांतरित केलं तर नक्कीच त्यांचा मानवाला त्रास होणार नाही. जर मी हा मुद्दा विधिमंडळामध्ये मांडला नसता तर माझ्या स्वर्गीय आईला ते आवडलं नसतं. तिला त्रास झाला असता. म्हणून मी आज मुद्दा विधिमंडळात मांडला", असे भाजपा आमदार राम कदम म्हणाले.


कबुतरांना मारून टाका, असं माझं म्हणणं नाही. मात्र, मुंबईतील नॅशनल पार्कमध्ये किंवा ठाण्याच्या हिलमध्ये यांना नेता येईल. यामुळे माणसांनाही धोका निर्माण होणार नाही. कबुतरांनाही जगता येईल. याबाबतीत मला कोणतही राजकारण करायचं नाही-भाजपा आमदार, राम कदम


उद्धव ठाकरेंनी काम केलं असतं तर...-मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. तर काही घटनांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला. "मुंबईमध्ये गेल्या चार दिवसात महिनाभराचा पाऊस पडला. यामुळे मुंबईत पाणी साठलं. मुंबईचा आकार हा बशीसारखा असल्यामुळे मुंबईमध्ये पाणी साठतं. 75 टक्के आजूबाजूला पाणी असलेलं हे शहर आहे. अशावेळी जोरात येणारा पाऊस आणि भरती यामुळे नक्कीच मुंबईकरांना त्रासाला समोर जावं लागलं. उद्धव ठाकरे यांनी इतक्या वर्षात यावर उपाय शोधला असता तर नक्कीच आज मुंबईची अशी हालत झाली नसती. मात्र, आता आमचं सरकार आलं आहे. आम्ही मुंबईच्या भविष्याचा विचार नक्की करू", असे आमदार राम कदम यांनी म्हटलं.

केईएम रुग्णालयाच्या फुफ्फुस विभाग आणि पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. अमिता आठवले यांनी आपलं प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात कबुतरांमुळे होणाऱ्या रोगाची माहिती दिली. त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं की, कबुतरांच्या विष्ठेमुळे माणसांच्या श्वसन क्रियेवर परिणाम होऊन अनेक विकार होऊ शकतात. हायपरसेंसिटिविटी न्यूमोनाइटिस होण्याची दाट शक्यता असते. विष्ठेतून तयार होणाऱ्या वायूमुळे रुग्णाची श्वसन क्रिया बंद होऊन रुग्ण कायमस्वरूपी ऑक्सिजन थेरपीवर जाऊ शकतो. इतकंच काय तर संबंधित रुग्णाला प्रसंगी फुफ्फुस प्रत्यारोपणाची आवश्यकताही भासू शकते".

राम मंदिराविषयी बोलण्याचा अधिकार काँग्रेसला नाही-दुसरीकडे अयोध्येतील राममंदिरात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारविरोधात काँग्रेसकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. याविषयी बोलताना राम कदम म्हणाले की, "राम मंदिराविषयी बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही. राम ही काल्पनिक व्याख्या आहे, असं काँग्रेसचं म्हणणं होतं. राम मंदिराला काँग्रेसनेच विरोध केला होता. यामुळे कारण नसताना स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी राम मंदिराचे नाव काँग्रेसनं घेऊ नये. त्यांना हा अधिकार नाही,"अशी टीका राम कदम यांनी केली.

हेही वाचा-

Last Updated : July 8, 2026 at 8:47 AM IST