साईंच्या चरणी प्रेमाची राखी अर्पण; 35 किलोची भव्य राखी ठरली आकर्षण, शिर्डीत भक्तिभावाने रक्षाबंधनाचा उत्सव साजरा
देशभरातून शिर्डीत दाखल झालेल्या हजारो भाविकांनी साईबाबांना आपला भाऊ मानून त्यांच्या चरणी प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक म्हणून विविध प्रकारच्या सुंदर राख्या अर्पण केल्या.

Published : August 28, 2026 at 1:58 PM IST
शिर्डी : नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाचा सण आज शुक्रवारी (28 ऑगस्ट) देशभरात उत्साह, आनंद आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे. साईंच्या पावन शिर्डीतही रक्षाबंधन उत्सव श्रद्धा आणि आस्थेच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
देशभरातून शिर्डीत दाखल झालेल्या हजारो भाविकांनी साईबाबांना आपला भाऊ मानून त्यांच्या चरणी प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक म्हणून विविध प्रकारच्या सुंदर राख्या अर्पण केल्या. साईबाबांच्या हातावर राख्या बांधून भाविकांनी आपले प्रेम आणि श्रद्धा व्यक्त केली.
साईचरणी राखी अर्पण : रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांनी साईबाबांच्या समाधीचं विधिवत पूजन करून साईचरणी राखी अर्पण केली. रक्षाबंधनानिमित्त देशभरातून भाविक साईबाबांसाठी प्रेमानं राख्या घेऊन शिर्डीत दाखल झाले. साईबाबांना भाऊ मानणाऱ्या महिला भाविकांसाठी शिर्डीतील रक्षाबंधनाला विशेष महत्त्व आहे. भाविकांनी आणलेल्या राख्या मंदिरातील पुजाऱ्यांच्या हस्ते साईबाबांच्या संगमरवरी मूर्तीच्या हातात बांधण्यात आल्या.

साईभक्तानं अर्पण केली 35 किलो वजनाची राखी : यंदाच्या रक्षाबंधन उत्सवात छत्तीसगडमधील बिलासपूर येथील साई माऊली परिवारानं अर्पण केलेली 35 किलो वजनाची, 36 फूट लांब आणि 5 फूट रुंद भव्य राखी विशेष आकर्षण ठरली. कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी तब्बल दोन महिन्यांच्या परिश्रमानंतर ही राखी तयार केली आहे. राखीवर आकर्षक कलाकुसर करण्यात आली आहे.
राखीचा आकार मोठा असल्यानं ती गाभाऱ्यात ठेवता आली नाही. त्यामुळे मंदिर परिसरात तिची स्थापना करण्यात आली. या भव्य राखीचं साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर आणि राखीचे देणगीदार साईभक्त प्रबोधराव यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं.

साईंच्या हातावर बांधल्या भाविकांनी राख्या : रक्षाबंधनानिमित्त आज पहाटे साई मंदिरात काकड आरतीनंतर साईबाबांना मंगलस्नान घालण्यात आलं. त्यानंतर साईबाबांच्या मूर्तीला आकर्षक आणि भरजरी वस्त्र परिधान करण्यात आले. सजलेल्या साईंच्या मूर्तीच्या हातात देशाच्या विविध भागांतून भाविकांनी आणलेल्या सुंदर राख्या मंदिरातील पुजाऱ्यांच्या हस्ते बांधण्यात आल्या.

साईबाबा हयातीत असताना शिर्डीतील महिला भक्त रक्षाबंधनाच्या दिवशी बाबांना राखी बांधत असत. साईबाबांना भाऊ मानून त्यांच्याप्रती प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करण्याची ही परंपरा आजही कायम आहे. साई संस्थान आणि भाविकांकडून दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी ही परंपरा भक्तिभावानं जपली जाते.
यंदाही देशाच्या विविध भागांतून भाविक साईबाबांसाठी विविध आकर्षक राख्या घेऊन शिर्डीत दाखल झाले. साईंच्या हातावर बांधण्यात आलेल्या या राख्यांमधून भक्त आणि साई यांच्यातील अतूट नाते अधोरेखित झाले. बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण शिर्डीत श्रद्धा, भक्ती आणि भावनेच्या अनोख्या संगमाने साजरा झाला.

