ETV Bharat / state

सोनं-चांदी महागलं, सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या राख्यांना मोठी मागणी!

सोन्या-चांदीचे दर (Gold Silver prices) गगनाला भिडले असतानाही रक्षाबंधनासाठी (Raksha Bandhan 2026) नाशिकच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या राख्यांची जोरदार खरेदी सुरू आहे.

Raksha Bandhan 2026
रक्षाबंधनासाठी बाजारात सोन्या-चांदीच्या राख्या (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 27, 2026 at 8:15 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक : सोन्या-चांदीचे दर (Gold Silver prices) मोठ्या प्रमाणात वाढले असतानाही रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) पार्श्वभूमीवर बाजारात राख्यांच्या खरेदीचे प्रमाण वाढलं आहे. सोन्याचा भाव प्रति तोळा सुमारे 1 लाख 60 हजार रुपये, तर चांदीचा भाव प्रति किलो अडीच लाख रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, पवित्र रक्षाबंधन सणानिमित्त बहिणी आपल्या लाडक्या भावासाठी सोन्या-चांदीच्या राख्या खरेदी (Gold Silver Rakhi) करताना दिसत आहेत.

सोन्याच्या राख्यांना मोठी पसंती : देशात सोन्या-चांदीचे भाव सातत्यानं वाढत असले तरी रक्षाबंधनाच्या निमित्तानं सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या राख्या खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यातील प्रेम आणि आपुलकीपुढे गगनाला भिडलेले सोन्या-चांदीचे दरही फिके पडल्याचं चित्र आहे. यंदा ग्राहकांकडून 22 कॅरेटच्या हलक्या वजनाच्या सोन्याच्या राख्यांना मोठी पसंती मिळत आहे. 0.5 ग्रॅमपासून पुढील वजनाच्या सोन्याच्या राख्या 3 हजार ते 18 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच, चांदीच्या राख्या 1,200 ते 5 हजार रुपयांपर्यंत विविध डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत. डायमंडच्या राख्यांनाही ग्राहकांकडून मागणी असून, त्या 15 हजार ते 35 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

रक्षाबंधनासाठी बाजारात सोन्या-चांदीच्या राख्या (ETV Bharat Reporter)

भाव वाढले तरी मागणी कायम : सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेमाची वीण अधिक घट्ट करणारा ठरत आहे. यंदा ग्राहक हलक्या वजनाच्या सोन्या-चांदीच्या राख्यांना पसंती देत आहेत. “आमच्याकडं 3 हजार रुपयांपासून सोन्याच्या, तर 1,200 रुपयांपासून चांदीच्या राख्या उपलब्ध आहेत. त्यामुळं ग्राहक आपल्या बजेटनुसार राख्यांची खरेदी करत आहेत,” अशी माहिती मयूर अलंकारच्या व्यवस्थापिका जयश्री पांगारकर यांनी दिली.

भावाकडूनही बहिणीसाठी खास गिफ्ट : सोन्याच्या राख्यांसाठी 12 ते 16 टक्के मेकिंग चार्ज आकारले जात आहे. कास्टिंग राख्यांसाठी 12 टक्के, तर पारंपरिक टेम्पल डिझाइनच्या राख्यांसाठी 16 टक्के मेकिंग चार्ज आकारण्यात येत आहे. राखीवर भावाचे नाव, ‘ॐ’, स्वस्तिक, देवतांची नावे आणि रुद्राक्ष अशा डिझाइनच्या राख्यांना यंदा विशेष पसंती मिळत आहे. तसेच, दीर्घकालीन बचतीचा विचार करून भावांकडून बहिणीला एक ते दोन ग्रॅमची सोन्याची नाणी किंवा चांदीची बिस्किटे भेट देण्याकडंही कल वाढल्याचं दिसून येत आहे.

भावासाठी सोन्याची राखी : “माझा भाऊ सध्या कामानिमित्त लंडनमध्ये स्थायिक आहे. यंदा तो खास रक्षाबंधनासाठी नाशिकला आला आहे. त्याच्यासाठी मी विशेष सोन्याची राखी बनवून घेतली आहे. या राखीवर त्याचं नावही आहे. ही त्याच्यासाठी खास सरप्राइज असणार आहे. ही राखी खरेदी करण्यासाठी मी गेल्या आठ महिन्यांपासून बचत करत होते. यंदा सोन्याचे भाव वाढले असले तरी भावाच्या प्रेमापुढे त्याची किंमत काहीच नाही,” असं खुशी दिघोळे यांनी सांगितलं.


हेही वाचा -

  1. जळगाव सोने चांदी भाव : सोन्याचा दर 1.56 लाखांवर, चांदीचा नवा विक्रम!
  2. साईचरणी सोन्याची 21 लाखांचे बिस्किटं अर्पण, प्रसादालयासाठी 70 लाखांचे डिशवॉशर मशीन देणगी
  3. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीचा भडका, 24 तासांत सोनं महाग; जाणून घ्या दर आणि महागाईचं कारण