ETV Bharat / state

विलासरावांवर बोलण्याची रवींद्र चव्हाणांची पात्रता नाही, राजू शेट्टी यांची भाजपावर टीका

लोकनेता आणि कार्पोरेटमधून आलेला नेता यातील फरक चव्हाणांनी समजून घ्यावा. मुद्दाम अशी वक्तव्यं केली जात आहेत, मात्र त्यातून यश मिळणार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.

Raju Shetty
राजू शेट्टी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 7, 2026 at 7:41 AM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

छत्रपती संभाजीनगर : दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर बोलण्याची रवींद्र चव्हाण यांची उंची नाही, अशी कडवी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. ते मंगळवारी (6 जानेवारी) छत्रपती संभाजीनगर इथं माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, मुद्दामहून अशी वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप करत शेट्टी यांनी सांगितलं की, विलासराव देशमुख हे सर्वसामान्यांचे फोन उचलणारे नेते होते. मात्र, रवींद्र चव्हाण यांनी ते आधी स्वतःच्या आमदारांचे तरी फोन उचलतात का, हे पाहावे, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

तसेच, अजित पवार यांना भाजपसोबत गेल्यानं अडचण वाटत असेल, तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी जाऊन माफी मागावी आणि भाजपासोबत न जाण्याची शपथ घ्यावी. मात्र, ते तसं करणार नाहीत, कारण भाजपाविरोधातील मतं घेऊन पुन्हा त्यांच्यासोबत राहण्याची त्यांची भूमिका असल्याची टीकाही राजू शेट्टी यांनी केली.

राजू शेट्टी (ETV Bharat)

'विलासरावांवर टीका करण्याची पात्रता नाही' : विलासराव देशमुख यांच्यावर टीका करण्याचा अधिकार रवींद्र चव्हाण यांना नाही. विलासरावांची उंची किती होती आणि रवींद्र चव्हाण यांची उंची किती आहे, हे पाहायला हवं. खरं तर, प्रत्येकाने आपल्या पात्रतेनुसारच राहिलं पाहिजे, अशी कडवी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.

लोकनेत्यांना बदनाम करून भाजपाला नेमकं काय साध्य करायचं आहे? असा सवाल करत हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं शेट्टी म्हणाले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी विरोधी पक्षात असूनही त्यांचा आदर करत होतो, कारण ते आदर करण्यासारखं व्यक्तिमत्त्व होतं, असंही त्यांनी सांगितलं.

रस्त्यावर पोलिसांनी गाडी पकडल्यावर सर्व सामान्य कार्यकर्त्यानं फोन केला तरी विलासराव तो फोन उचलत असत. मात्र, रवींद्र चव्हाण स्वतःच्या आमदारांचे तरी फोन उचलतात का, हे त्यांनी पाहावे, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

लोकनेता आणि कार्पोरेटमधून आलेला नेता यातील फरक चव्हाण यांनी समजून घेतला पाहिजे. मुद्दाम अशी वक्तव्ये केली जात आहेत, मात्र त्यातून त्यांना यश मिळणार नाही. लातूरमध्ये याचा फटका त्यांना बसल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली.

दरम्यान, राज्यभरातून टीकेची झोड उटल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. “देशमुख बंधूंच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो,” असं चव्हाण यांनी मंगळवारी म्हटलं.

'अजित पवार यांनी रायगडावर शपथ घ्यावी' : अजित पवार यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाशी शपथ घ्यावी की, यापुढे ईडी मागे लागली किंवा अन्य कोणतीही अडचण आली तरी आपण भाजपासोबत जाणार नाही, तरच लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील, असंही शेट्टी म्हणाले. मात्र, अजित पवार तसं करणार नाहीत, कारण निवडणूक झाली की ते पुन्हा भाजपासोबत जाणार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तसेच, भाजपानंही स्पष्टपणे सांगावं की, आम्ही अजित पवार यांना सोबत घेणार नाही. मात्र भाजपाही तसं करणार नाही, असा टोलादेखील शेट्टी यांनी लगावला. सरळसरळ भाजपा आणि अजित पवार महाराष्ट्राला उल्लू बनवण्याचं काम करत असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.

भाजपाला जी मतं मिळणार नाहीत, ती मतं विरोधकांना न मिळता आपल्या पदरात पाडून घेण्यासाठीच हे सगळं केलं जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. भाजपा जातीधर्माच्या नावावर मतं घेईल आणि सेक्युलर मतं अजित पवार घेण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर सर्वजण पुन्हा एकत्र येऊन गुण्यागोविंदानं राहतील, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली.

'बिनविरोध निवडणूक म्हणजे काळाबाजारी' : मनपा निवडणुकीत बिनविरोध उमेदवार निवडून येणं म्हणजे मोठ्या प्रमाणात काळा पैसा वापरला गेला असल्याचं लक्षण असून, हे पोलीस आणि गृह विभागाचं अपयश आहे, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. ज्या भाजपानं काळ्या पैशाच्या विरोधात मुद्दा उपस्थित करून सत्ता मिळवली, त्याच सरकारमध्ये आज काळा पैसा धोधो वाहू लागला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

नगरपालिका निवडणुकांमध्ये मतांचा दर 10 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आता महानगरपालिका निवडणुकीत हे दर किती असतील, याची कल्पनाही करता येत नाही, असंही शेट्टी म्हणाले. मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाजारात आला असून, सामान्य माणसाला बँकेतून पैसे काढण्यासाठी नियम आहेत, मग उमेदवारांकडे एवढा पैसा आला कुठून? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधी रुपये दिले जात असल्याचे प्रकार समोर आले असून, दुसरीकडे गुंड-मवालीच उमेदवार बनल्याचं चित्र आहे. धमकावून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्याची उदाहरणंही समोर आली आहेत. हे प्रकार लोकशाहीसाठी घातक असताना बावनकुळे यांनी याला चांगलं म्हटलं आहे. मग मुख्यमंत्री पदाचाही लिलाव करा, अशी उपरोधिक मागणीदेखील राजू शेट्टी यांनी केली.

हेही वाचा