ETV Bharat / state

'त्या' व्हायरल व्हिडिओमागं सतेज पाटील; आमदार राजेश क्षीरसागरांचा थेट आरोप, कोल्हापुरात राजकीय युद्ध भडकलं

आमदार राजेश क्षीरसागरांनी कथित व्हिडिओप्रकरणी काँग्रेस आमदार सतेज पाटलांवर आरोप केला आहे. हा व्हिडिओ 'AI'द्वारे बदनामीसाठी बनवल्याचा दावा करत त्यांनी सायबर पोलिसात तक्रार केली आहे.

RAJESH KSHIRSAGAR PC ON VIRAL VIDEO
माध्यमांशी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 28, 2026 at 6:30 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर : शिवसेना आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या कथित व्हिडिओचे पडसाद आजही (दि.28) रविवारी कोल्हापुरात उमटले. वायरल व्हिडिओ मागं काँग्रेस आमदार सतेज पाटील आहेत. हा व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मला बदनाम करण्यासाठी बनवण्यात आला, असं स्पष्टीकरण आमदार राजेश क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना दिलं. तर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार सतेज पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आमदार राजेश क्षीरसागर यांना बदनाम करण्याचं हे कारस्थान असल्याचं सांगत करवीर निवासिनी आई अंबाबाई क्षीरसागर यांना या संकटातून बाहेर काढेल असा विश्वास व्यक्त केला.

...हे आपल्याला शोभत का? : "महायुती माझं भांडवल, माझ्याकडं कोणतं कॉलेज नाही, संस्था नाही, 2009 साली गृहराज्यमंत्री असताना माझ्यावर हल्ला झाला होता. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं माझे कार्यकर्ते, महायुती आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते रविकिरण इंगवले यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी हे केलं आहे. या व्हायरल व्हिडिओ मागं काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आहेत. आमदार सतेज पाटील आपण सभ्य राजकारणी आहेत, हे आपल्याला शोभत का?. याबाबतची तक्रार सायबर पोलिसांना दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ एआयचा वापर करून केला आहे," असं आमदार राजेश क्षीरसागर यांनी रविवारी (दि.28) माध्यमांशी बोलताना सांगितलं.

माध्यमांशी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर आणि मंत्री चंद्रकांत पाटील (ETV Bharat Reporter)

टीआरपी वाढवण्यासाठी आमदार सतेज पाटलांचं नाव : "कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ, 100 कोटींचे रस्ते, रंकाळा सुशोभीकरण या कामांना सरकारकडून निधी मंजूर झाला आहे. या सर्व व्यवहारांमध्ये आमदार राजेश क्षीरसागर त्यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांचा अधिकारी आणि प्रशासनावर दबाव आहे. यातून होणारे पाप कृत्य लपवण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचं नाव घेतलं. स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सपोर्ट करतील यासाठी सहानुभूती निर्माण करू नका, असा पलटवार काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी केला. जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत लाटकर बोलत होते.

Rajesh Kshirsagar PC on Viral Video
माध्यमांशी बोलताना राजू लाटकर (ETV Bharat Reporter)

आमदार क्षीरसागर यांना अडचणीत आणण्यासाठी कारस्थान : "आमदार राजेश क्षीरसागर यांना नॉर्मल मार्गानं मागं ढकलता येत नाहीत म्हणून असे प्रयत्न सुरू आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या आधी सुद्धा हा प्रयोग झाला. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नाही. लोकांना माहिती आहे हा माणसांमधला खमका नेता आहे. आता जो प्रयत्न चाललाय त्यातून काहीही हाताशी लागणार नाही. आमदार राजेश क्षीरसागर यांना अडचणीत आणण्याचं हे कारस्थान आहे. करवीर निवासिनी अंबाबाई सगळं पाहत आहे. तीच राजेश क्षीरसागर यांना या संकटातून बाहेर काढेल. आम्ही सगळेच राजकीय नेते काचेच्या घरात राहतो. त्यामुळं दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याआधी ही भीती मनात बाळगली पाहिजे की आपल्याही घरावर दगड येईल, या लेवलला जाऊन राजकारण कधीही करता येत नाही. जे आमदार सतेज पाटील करत आहेत. सतेज पाटील यामध्ये आहेत की नाही मला माहित नाही. माझ्या हाती ज्यावेळी पुरावे येथील त्यावेळी राजेश क्षीरसागर यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीन मी हा मुद्दा मांडेल. ज्यानं हे केलं आहे त्यांना मी एवढेच म्हणेन की, अशानं काही आपण मोठे होत नाही. आमदार राजेश क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे. त्यामुळं त्यांच्या नावावर कोणताही प्रस्ताव आणायचा असेल तर विधानसभा अध्यक्षांची परवानगी लागते. संसदीय आयुध कशीही वापरता येत नाहीत, असं सांगत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजेश क्षीरसागर यांची पाठराखंड केली.

उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त माणूस : शिवसेना (उबाठा) पक्षाचे उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त माणूस आहेत. हा माणूस वाऱ्याशी भांडत असतो. त्यामुळं उद्धवजींचं वाऱ्याशी भांडण सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना समोर कोणताही स्ट्राँग माणूस दिसत नाही. ज्याच्यावर आरोप केल्यामुळं काही फरक पडेल. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आता राज्यभर प्रवास करत आहेत. त्यांनी हाच प्रवास अगोदर केला असता कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं ऐकलं असतं, वेळेत विषय संपवला असता तर ही वेळ आली नसती, असा टोलाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे यांना लगावला.

हेही वाचा :

  1. आमदार राजेश क्षीरसागरांचा कथित 'स्टिंग' व्हिडिओ व्हायरल; क्षीरसागरांचा रविकिरण इंगवलेंवर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा
  2. मन की बात : पंतप्रधान मोदींकडून नांदेडच्या पेठकर कुटुंबाचे कौतुक, लग्नात साडेतीन हजार ग्रामस्थांना दिले 'अपघात विमा कवच'
  3. TET पेपरफुटीवर मनसेचा संताप; मंत्र्यांच्या पोस्टरवर अंडी फोडून सरकारचा केला निषेध